Breaking News

आघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया हेतुपूर्वक किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत कमी मुंबईकरांनी लोकल मधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा असल्याचे दिसते आहे. अनेक निर्बंधांनी वैतागलेल्या सामान्य मुंबईकरांची लोकल कोंडी करणे राज्य सरकारने थांबवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल मधून प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने सातत्याने केली होती. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. या आंदोलनामुळे राज्य सरकारला जाग आली आणि १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेली प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त २० ते २२ हजार मुंबईकरांना ही परवानगी मिळवता आली. कमीत कमी लोकांनी लोकलमधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा दिसते आहे. राज्य सरकारने परवानगी मिळवण्यासाठी जे अडथळे घातले आहेत ते पाहता दोन डोस घेतलेल्या सर्व मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी केव्हा मिळणार हा प्रश्नच असल्याचे ते म्हणाले.

१५ ऑगस्ट नंतर अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी मंदिरांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन मंदिरांवरील निर्बंध उठविण्याची गरज होती. मात्र हे निर्बंध कायम ठेवून आघाडी सरकारने आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणे घेणे नसल्याचेच दाखवून दिल्याचा आरोप त्यांनी केला.

आघाडी सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा केला असल्याचे सांगून ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय मंजूर होऊ शकला नाही यावरून हे सरकार शिक्षण सम्राटांच्या हिताला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विषयक धरसोडीच्या धोरणांचा फटका विद्यार्थी, पालकांना बसतो आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *