Breaking News

कंगना टीम म्हणजे कंगना +भाजप आय टी सेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महाराष्ट्राची विनाशर्त माफी मागावी- काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

कंगना टीम म्हणजे “कंगना + भाजप आय टी सेल” असून कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा आणि आमची मुंबईवरती प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. याबद्दल कंगना रानावतचे बलोविते धनी असलेल्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. भाजपा सातत्याने जाणिवपूर्वक महाराष्ट्राचा अपमान करत आहे. निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागायचा आणि निवडणूक झाली की महाराजांचा अवमान करायचा हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याची सल आणि राग असल्यानेच दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे भाजप नेते सातत्याने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. कंगना राणावत आयटी सेलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबई पोलिसांचा अवमान करत होती. आता तर तिने मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे. तिच्या या कृत्याचा निषेध करण्याऐवजी भाजप आमदार राम कदम कंगनाची तरफदारी करत आहेत, हा निर्लज्जपणाचा कळस असून महाराष्ट्र द्रोह आहे. त्यातही ज्या मुंबईने कंगना राणावतला नाव मिळवून दिले तिनेच मुंबईचा अवमान केला. अशा कृतघ्न स्त्रीची तुलना राम कदम झाशीच्या राणीशी करतात याचा आम्ही निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

कंगना राणावत वारंवार बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन बाबत आपल्याला माहिती असल्याचे सांगत आहे. तिच्याकडे माहिती असेल तर तिने या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय, एनसीबी, ईडी या तपासंस्थाकडे जाऊन आपला जबाब नोंदवावा. मुंबई पोलीसांचा संबंध नसताना ती खोटे नाटे आरोप करत आहे, हा महाराष्ट्राच्या बदनामीचा कट आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलीसांची वाखाणणी करणाऱ्या कंगनाची भाषा भाजपाच्या सांगण्यावरून बदलली आहे.

कंगनाच्या समर्थनार्थ उतरलेले भाजप आमदार राम कदम बॉलिवड ड्रग कनेक्शनबाबत वारंवार बोलत आहेत. ते भाजपाच्या ड्रग कनेक्शनचे आद्य जाणकार आहेत. काही वर्षापूर्वी ड्रगच्या अतिसेवनामुळे मृत्यू पावलेले विवेक मोईत्रापासून राम कदम यांना त्या कनेक्शनची माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडचेही निकटचे संबंध आहेत. त्यांची केंद्रीय नार्कोटीक्स विभागाने नार्को टेस्ट केल्यास ड्रगचा काळाधंदा आणि त्याचे बॉलिवूड कनेक्शन यावर प्रकाश पडेल. तसेच संदिप सिंह याने ५३ वेळा भाजपा कार्यालयात कोणाला फोन केला? गौरव आर्याचे पार्टनर भाजपा नेते आहेत का? हे गोवा कनेक्शन काय आहे? कोणत्या भाजपा नेत्यांचा पैसा ड्रगमध्ये गुंतला आहे? याचाही उलगडा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *