Breaking News

पत्रकार संजय घावरे यांचा कलाश्रम पुरस्काराने सन्मान डॉ.संध्या पुरेच्या यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबईः प्रतिनिधी
दिवंगत स्वातंत्र्यसैनिक डॅा. परशुराम पाटील कलाकेंद्र कलाश्रमच्या वतीनं प्रत्येक महिन्यात निधन पावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारीतेत लक्षवेधी कामगिरी करणारे वरिष्ठ वार्ताहर संजय घावरे आता या दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील आणि कलाश्रमच्या संचालिका नंदिनी पाटील यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ‘अभियान सन्मान’ या उपक्रमांतर्गत संजय घावरे यांना दिवंगत पत्रकार ह. शि. खरात यांच्या स्मरणार्थ ‘दखलपत्र’रूपी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात संगीत नाटक अकादमी पुकस्कार प्राप्त प्रख्यात नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांच्या हस्ते ‘दखलपत्र’ प्रदान करून संजय घावरे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने संजय घावरे यांनी आजवरच्या आपल्या २० वर्षांच्या करियरमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ‘साप्ताहिक विवेक’नंतर दैनिक ‘वृत्तमानस’पासून खऱ्या अर्थानं संजय घावरे यांच्या पत्रकारीतेला नवी दिशा मिळाली. यात दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तसमूहातील ‘मुंबई चौफेर’ या मराठी सायं दैनिका सोबतच ‘हिंदमाता’ या हिंदी दैनिकाचा आणि ‘तेजस्वी भारत’ या साप्ताहिकाचा मोठा वाटा आहे. याशिवाय ‘लोकमत’मध्ये त्यांनी केलेली कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे. लंडन, श्रीलंका आणि दुबईमधून त्यांनी ‘लोकमत’साठी केलेलं वृत्तांकन विशेष लक्षणीय ठरलं आहे. त्यानंतर ‘मी मराठी LIVE’, ‘जनशक्ती’, ‘मराठी ई बातम्या.कॉम संकेतस्थळ’, ‘मुंबई लाईव्ह’ असा त्यांचा दैनिकांकडून डिजीटल विश्वाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या वाटचालीतील कलाश्रमच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे.
जानेवारी महिन्यात देवाज्ञा झालेल्या डॅा. चारुशीला ओक, ह. शि. खरात, ललीता बापट, वि. स. बर्वे या पत्रकारांच्या स्मरणार्थ संजय घावरेंसोबत पत्रकार जगदीश भोवड, शिल्पा सुर्वे आणि अरुण घाडीगावकर यांनाही सन्मानित करण्यात आलं. यासोबतच पतीच्या निधनानंतर स्वबळ सिद्ध करणाऱ्या १० महिलांचा रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार राजेंद्र घरत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुहास कामत आणि तुळशीदास सन्नके यांचं पाठबळ लाभत असून, अनिता कामत याच्या पुरस्कर्त्या आहेत. श्रद्धा धामणकर या तरुणीनं या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. स्वकूल पवार, प्रतिभा मांजरेकर, जयेश चव्हाण, शंकर राजगुडे यांनी दखलपत्राचं वाचन केलं.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *