पुणेः प्रतिनिधी
देशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय राहिलेल्या माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत यांचे आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.
त्यांच्यावर उद्या सकाळी बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी निुयुक्ती करण्यात आली. १९९५ साली ते या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले.
१९८२ साली झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी आणि शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील ४ मंत्र्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सर्वोच्च न्यायालय आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर लोकशासन आंदोलनाची त्यांनी स्थापना करत आर्थिक दुर्लब घटकातील, गरीब कष्टकरी जनतेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकशाहीवादी विविध संघटनांशी ते संबधित होते.
माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी पी.बी. सावंत यांच्याबाबत भावना व्यक्त करताना सांगितलं की, “त्यांची आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते”.
