Breaking News

आमदार जिग्नेश मेवाणी, डावा नेता कन्हैयाकुमार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला प्रवेश सोहळा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

देशातील आगामी गुजरात, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि डाव्या चळवळीत तरूण नेता कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पाटीदार नेता हार्दीक पटेलही यावेळी उपस्थित होता.

नवी दिल्लीतील आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी प्रवेश केला.

गुजरातच्या मागील विधानसभा निवडणूकीत जिग्नेश मेवानी यांनी विजय मिळविला होता. तसेच त्यांच्या निवडणूक प्रचाराची त्यावेळी संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. तर मागील लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या विरोधात पहिल्यांदाच सीपीआय-एमकडून बिहार मधून कन्हैयाकुमार यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या या निवडणूकीची आणि त्यांना मिळालेल्या मतांचीही त्यावेळी चांगलीच चर्चा झाली.

त्यानंतर जिग्नेश मेवानी, हार्दीक पटेल आणि कन्हैया कुमार हे सातत्याने देशभर भाजपा विरोधात आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारधारेच्या विरोधात विविध आंदोलनात ते सहभागी होत होते. त्याचबरोबर केंद्र सरकारने आणलेल्या कायदे आणि धोरणाच्या विरोधात आंदोलनेही केली.

काँग्रेस प्रवेशानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, पंतप्रधान फक्त नावाला आहेत, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते. जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही, असं फक्त मलाच नाही तर देशातल्या सर्व तरुणांना वाटू लागले आहे. आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष प्रवेशाचा अर्ज भरत होतो, तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे.

या देशात भारतीय होण्याची जी ओळख आहे, ज्यात सत्तेला आव्हान देण्याचं सामर्थ्य आहे. त्या भारतीय चिंतन परंपरेला वाचवण्याची आज गरज आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. कारण हाच तो पक्ष आहे जो महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, नेहरु, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. समानता आणि समता ही कोणा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तो भारताचा इतिहास आहे. आणि भारताच्या या इतिहासाला काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्यात सामावून घेतले आहे. त्यामुळे मला असे लक्षात येत आहे की देशात भाजपासमोर इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस या सर्वात जुन्हा पक्षाला वाचवलं नाही, मोठ्या जहाजाला वाचवलं नाही, तर इतर छोटी जहाजेही बुडून जातील अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *