Breaking News

जयंत पाटील म्हणाले, भाजपाचा सुर्य मावळणार नाही या भ्रमात होते पण… शेतकऱ्यांना 'साले' बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा - जयंत पाटील

जालना-भोकरदन: प्रतिनिधी

मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजपनेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं, लोकं पक्ष सोडून जात होते. आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांना धन्यवाद देत ते म्हणाले की, २०२४ ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा वापस येऊ इच्छितात अशांना सोबत घ्या, त्यांचे कुणी पक्ष सोडत असतील तर त्यांना आपल्या पक्षात घ्या. निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करण्याची सूचना पक्ष कार्यकर्त्यांना केली.

मला मान्य आहे इथला कार्यकर्ता लढवय्या आहे मात्र आपण किती काळ लढाईच करणार ? त्यामुळे २०२४ ला गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायला हवा. राज्यात आणि दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने डोक्यावरील सुर्य कधी मावळणार नाही अशा भ्रमात भाजप होती, परंतु तो सुर्य मावळला आहे. आपलं सरकार प्रभावीपणे काम करतंय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे शिवाय विरोधकांनाही आपलं सरकार आहे हेही जाणवलं पाहिजे. भोकरदन मतदारसंघात चंद्रकांत दानवे म्हणतील ते झालं पाहिजे असं सर्व अधिकार्‍यांना राजेश टोपे तुम्ही सांगा असा आदेशच त्यांनी दिला.

संवाद यात्रेत भोकरदनचे नेते चंद्रकांत दानवे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आपले विचार मांडले. या संवाद यात्रेला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, निरीक्षक संजय वाकचौरे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुका पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठीची भूमिका असली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची भूमिका आग्रही राहिली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भोकरदन येथील संघटना ही प्रचंड लढवय्यी आहे, समोरच्या बाजूला मोठी ताकद असतानाही तोडीची झुंज राष्ट्रवादी इथे देत आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा आहे अशी शाब्बासकी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

माजी आमदार चंद्रकांत दानवे इथे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करतात. रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टींवर याबाबत मागणी करत असतात. आपला स्वतःचा आमदार नसल्याने इथे थोड्याबहुत प्रमाणात अडचण येते मात्र या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.

भाजप ओबीसी आरक्षणाबाबत धादांत खोटा प्रचार करत आहे. ओबीसी समाजाच्या एकाही जागेला धक्का लागता कामा नये याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यामुळे भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले.

जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपूर्ण शासन काम करत आहे. आज कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या भागाला नव्या कोऱ्या रुग्णवाहिका दिल्या आहे.राजेश टोपे जालनावासियांसोबत उभा राहिला होता, आजही उभा आहे आणि उद्याही उपस्थित राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *