Breaking News

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली विमानतळाला संभाजी महाराजांचे तर मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण चांगलेच रंगल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिल्यानंतर औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असे नामांतर करण्याचा प्रस्ताव अनिल परब यांनी विधानसभेत मांडला. त्यावेळी भाजपाचे सदस्य गैरहजर होते. तशातच हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

अर्थमंत्री अजित पवारांच्या उत्तराने समाधान न झाल्याने भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला होता. मात्र विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव सभागृहात मंजूर होताना त्यावेळी भाजपाचे सदस्य पुन्हा सभागृहात येवू लागले.

त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाची भूमिका अर्थसंकल्पावरून एकवेळ समजू शकते. मात्र विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या प्रक्रियेवेळी विरोधी पक्ष गैरहजर राहतोय. यावरून भाजपाचे संभाजी महाराजांवर प्रेम किती आहे ते समजते असा उपोरिधक टोला लगावला.

याची तात्काळ दखल भाजपाचे आशिष शेलार यांनी घेत, संभाजी महाराजांवर तुमचे जितके प्रेम आहे, तितकेच प्रेम आमचे आहे. फुसक्या बेंडकुळ्या दाखवून असा टोला लगावत तुम्ही जरी हा प्रस्ताव मंजूर केलेला असला तरी तो शेवटी हा प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे. आणि केंद्रात आम्हीच असून तो मंजूर ही आम्हीच करणार आहोत. मात्र तुमचे प्रेम बेगडी असून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय तुम्ही घेतला होतात. मात्र आज पुन्हा शहराचे नामांतर करण्याऐवजी केवळ विमानतळाचे करतायत त्यामुळे तुमचे प्रेम बेगडी असल्याची टीका केली.

नामांतराचा ठराव वाचून दाखविताना आणि तो मंजूर करताना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन वेळा विमानतळाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असा केला. मात्र तिसऱ्यांदा छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात येत असल्याची दुरूस्ती करत हा ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले.

त्यानंतर सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा नामविस्तार नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल असे करण्याविषयीचा ठराव विधानसभेत मांडला.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामांतराला कोणाचा विरोध आहे कोणाचा नाही काही कळायला मार्ग नसल्याची उपरोधिक टीका करत विरोधी पक्ष गैरहजर राहत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर आशिष शेलार यांनी आम्ही असले छोटे राजकारण करत नाही आणि करणार नसल्याचे सांगत गेली २५ वर्षे पालिकेत सत्ता असूनही नाना शंकरेशेठ यांचे नाव देण्याचे काम अद्याप केले नसल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला.

या निशाण्याचा घाव शिवसेनेवर बरोबर बसत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आहे. याविषयीचा प्रस्ताव मनमोहन सिवलकरांनी यापूर्वीच आणला असल्याची आठवण करून देत मग मागील पाच वर्षात तुम्ही का नाही आणला नामांतराचा प्रस्ताव असे प्रतित्तुर देत शेलार यांच्यावर कडी केली.

त्यावर भाजपाच्या योगेश सागर यांनी उस्मानाबाद, औरंगाबादचे धाराशीव आणि संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव लगेच सभागृहात मांडा व मंजूर करा असे आवाहन शिवसेनेला दिले.

त्यावर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी योगेश सागरजी तुम्ही तालिका अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे आणि शेलार हे मंत्री होते. त्यामुळे असा प्रस्ताव लगेच मांडता येतो का तुम्हाला माहित असल्याची आठवण करून देत या वादावर पडदा टाकला.

Check Also

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *