Breaking News

जळगांवच्या त्या प्रकरणात चौकशी अंती तथ्य नसल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई: प्रतिनिधी

पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महिला वसतीगृहातील तरूणींना कपडे काढून नाचविल्याच्या एका वृत्तामुळे विधिमंडळाच्या सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी चांगलेच लावून धरले. त्यावर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा महिला उच्च अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशी समितीचा अहवाल आज विधिमंडळात मांडताना असा कोणताही प्रकार तेथील वसतीगृहात झाल्याचे निष्पण्ण झाले नसल्याची वस्तुस्थिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर जळगांव येथील त्या प्रकरणात गृहमंत्री देशमुख यांनी निवेदन वाचून दाखविले.

जळगांव येथील महिला वसतीगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यांवरुन विधानसभेत बुधवारी वातावरण तापले होते. गृहमंत्र्यांनी यातील सत्य तपासून कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. मात्र याप्रकरणात तथ्य नसल्याचे त्यांना तपासात आढळून आले.

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे बुधवारी विधानसभेत महिला सदस्यांनी या विरोधात जोरदार आवाज उठविला. वसतीगृहात एकूण १७ महिला आहेत. या महिलांनी वसतीगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले. महिलांसोबत चर्चा केली. महिलांचे वसतीगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये गेल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांना दिला असून तो मी पटलावर ठेवतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले.

ज्या महिलेने तक्रार केली होती. त्या महिलेच्या पतीने अनेकदा तक्रार केली होती की माझी पत्नी वेडसर आहे. तिला रुग्णालयात दाखल करा, असेही गृहमंत्र्यांनी माहिती देताना सांगितले. गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांना प्रतिप्रश्न करत कोरोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? असा सवाल केला. त्यावरही, अनिल देशमुखांनी सांगितलें की, १७ महिलांना कविता म्हणण्याचे, गाणी गाण्याचे बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या,असे उत्तर दिले.

जळगांव जिल्हयाचे नांव बदनाम करू नका

एखादया प्रकरणाची पूर्ण माहिती घेवून आणि त्याची शहानिशा करूनच माहिती दिली पाहिजे. विनाकारण जिल्हयाचे नांव बदनाम करू नये अशी विनंती जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. महिलांवर अन्याय, अत्याचार होवू नये यासाठी सरकार पूर्ण दक्षता घेत आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर त्याची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *