Breaking News

मुंबई की पत्रिका मे मियाँ का नाम है… सुप्रसिध्द अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई: प्रतिनिधी
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे सुप्रसिध्द अभिनेते इरफान खान यांचे रात्री निधन झाले. गेले काही महिने ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अखेर कोकिलाबेन रूग्णालयात त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
इरफान खान मूळचा राजस्थान मधील टोंक येथील, त्याचे वडील टायरचा व्यवसाय करायचे. त्याला क्रिकेटर व्हायचे होते. मात्र पैशाअभावी त्याला क्रिकेटर होता आले नाही. कदाचित त्याचे अॅक्टींगमध्ये नशीब असल्याने त्याला परिस्थितीने या क्षेत्राकडे वळविले. त्यासाठी नंतर त्याने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे रितसर शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअरला सुरुवात केली.
इरफान खान यांच्या संपूर्ण चित्रपटातील कारकिर्दीकडे पाहिल्यास त्यांच्या वाट्याला यशापेक्षा फक्त संघर्षच आल्याचे दिसून येते. मात्र त्याच्याच चित्रपटातील संवादाप्रमाणे त्याचे नाव मुंबईतल्या बॉलीवूड नामक पत्रिकेत असल्याने तो इथे आला आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही आपला ठसा उमटविला.
मीरा नायर या सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शिकेच्या सलाम बॉम्बे या चित्रपटात त्याला छोटीशी भूमिका मिळाली होती. नीरजा गुरेली लिखित चंद्रकांता या दूरदर्शनवरील मालिकेत त्यांना बद्रीनाथ या व्यक्तीरेखीची भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित चाणाक्य मालिकेतही त्यास संधी मिळाली. मात्र त्यानंतर त्यांना फारसे काम मिळेनासे झाले. काही वर्षानंतर त्यांना मनोज बाजपेयी यांच्याबरोबरील शूल या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले तरी त्यांना पुन्हा स्थान मिळविण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागली.
त्यानंतर प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री, निर्माती पूजा भट यांनी इरफान खान यास रोग चित्रपटात संधी दिली. या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका त्याच्या वाट्याला आली. त्यातील त्यांच्या अभिनयाने बॉलीवूडला त्यांच्यांतील खऱ्या कलाकाराची जाणीव झाली. त्यानंतर विशाल भारद्वाज दिग्दर्शित मकबूल या चित्रपटाने तर इरफानला खऱ्या अर्थाने यश आणि स्टारडम मिळवून दिले. या चित्रपटानंतरच इरफानच्या खऱ्या अर्थाने बॉलीवूडमधील प्रवासाला सुरुवात झाली. त्यातील त्याच्या अभिनयाने तर अख्या इंडस्ट्रीला हलवून सोडले. तत्पूर्वी हासील चित्रपट त्याचा आला होता.
या चित्रपटानंतर नेमसेक, लाइफ इन मेट्रो सारखे हटके चित्रपट आले. पण याच कालावधीत पानसिंग तोमर या धावपटूच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मुख्य भूमिकेमुळे पान सिंग तोमरच्या आयुष्याचा आलेखच प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभा रहात असे अनेक पान सिंग तोमर असल्याची बाब लक्षात आली. चॉकलेट, द किलर, नॉक आऊट आदी चित्रपट केले.
त्यानंतर न्युयॉर्क, बिल्लू बारबर, लंच बॉक्स, सात खून माफ, २४-७ डेडलाईन, साहेब बीबी और गँगस्टर, तलवार, पिकू, हिंदी मिडियम, मदारी या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाची चांगलीच वाहवा झाली. तर हॉलीवूडमधील द वॉरियर, द अमेझिंग स्पायडर मॅन, लाईफ ऑफ पा, ज्युरासिक वर्ल्ड, इन्फेरनो, स्लमडॉग मिलेनियर, अ माइटी हार्ट आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका वाखाणण्या जोग्या होत्या. त्याने भूमिका केलेले अनेक चित्रपट हे वास्तवात घडलेल्या घटनांच्या जवळ जाणारे होते. त्यामुळे कदाचीत त्याचा अभिनय पाहणाऱ्या चित्ररसिकांना कुठे तरी जवळचा वाटत राहीला. त्यांचा इंग्रजी मिडियम हा चित्रपट मार्च महिन्यात रिलिज झाला होता. मात्र त्यावर कोरोना आजाराचे सावट पडल्याने या चित्रपटाला आर्थिक यश फारसे मिळाले नाही. मात्र यातील इरफानच्या अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा झाली. हा चित्रपट त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
मागील काही वर्षातील त्याच्या या चित्रपटाची यादी पाहिली तर खास त्याला नजरेसमोर ठेवून चित्रपट लिहीले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या अभिनयामुळे आणि विविधारंगी व्यक्तीरेखेमुळे इरफान खान हे नाव सर्वातोमुखी झाले. तसेच त्याचा चित्रपट म्हणजे खास अभिनय पाहण्याची परवनी असेच म्हटले जायचे. त्यामुळे बॉलीवूडमधील त्याचे स्थान पक्के होवून त्याच्या आयुष्यातील खऱ्या स्टारडम असलेल्या आयुष्याला सुरुवात झाली होती. मात्र नेमक्या वयाच्या ५३ व्या वर्षी त्याच्यावर आजाराबरोबरच्या संघर्षात कॅन्सरने त्याच्यावर मात केल्याने त्याचा संघर्ष थांबला. त्याच्याच मकबूल या चित्रपटातील संवादाप्रमाणे, मुंबई की पत्रिका मे मियाँ का नाम है, और मियाँ को मुंबई मिलेगी…. हा संवाद चित्रपटात जरी वेगळ्या संदर्भात असला तरी याप्रमाणे मुंबई अर्थात बॉलीवूडही आणि हॉलीवूडही मिळाले. पण संघर्षातून.

Check Also

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *