Breaking News

गृहमंत्री देशमुखांनी १०० कोटींचे टार्गेट दिले, हवे तर वाझेचा फोन तपासा आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र व्हायरल सत्येतेबाबत शंका

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आधीच पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मनसुख हिरे मृत्युप्रकरणावरून आधीच अडचणीत आले असतानाच आयपीएस अधिकारी तथा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला बीअरबार आणि हुक्का पार्लरवाल्यांकडून १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करत हवे तर अटकेत असलेल्या सचिन वाझे याचा फोन तपासा असे पत्रात नमूद केल्याने संपूर्ण पोलिस दल, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच महाविकास आघाडीच्या काराभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मात्र या पत्रावर परमबीर सिंग यांचे नाव असले तरी त्याखाली त्यांची स्वत:ची सही नसल्याने पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

व्हायरस झालेल्या पत्रात परमबीर सिंग म्हणाले की, फेब्रुवारी २०२१ मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरुवातीला मुंबई पोलिस क्राईमचे सचिन वाझे यांना त्यांच्या शासकिय ज्ञानेश्वरी या बंगल्यावर बोलावून घेतले. तसेच दर महिन्याला १७५० बीअरबार चालक आणि हुक्का पार्लरकडून दर महिन्याला १०० कोटी रूपये द्यावेत असे सांगितले. त्यानंतर वाझे यांनी माझ्या कार्यालयात येवून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर डिसीपी भुजबळ आणि एसीपी पाटील यांनाही गृहमंत्री देशमुख यांचे खाजगी सचिव पलांडे यांनी बोलावून घेतले. त्यांचीही मंत्री देशमुख यांच्याशी भेट घालून देत त्यांनाही इतक्याच रकमेची वसुली करण्यास सांगितले. तसेच प्रत्येक बारवाल्यांकडून प्रति महिना ३ लाख रूपये वसुल केल्यास साधारणत: ५० कोटी रूपयांची रक्कम वसुल होवू शकते. राहिलेले ५० कोटी इतर प्रकारातून वसूल करण्यास सांगण्यात आले.

गृहमंत्री देशमुख यांच्याकडून एसीपी पाटील हे निघाल्यानंतर त्यांनीही मला माझ्या ऑफिसमध्ये येवून गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. त्यानंतर वाझे हे भेटले का अशी विचारणा पाटील यांच्याकडे केली. त्यावर पाटील यांनी वाझे पाटील यांना भेटल्याचे सांगितले. त्यानंतरही पाटील आणि आपल्यात यासंदर्भात मेसेजवरून चर्चा झाल्याचे सांगत ते सर्व मेसेजचा संदर्भ परमबीर सिंग यांनी पत्रात उद्घृत केला.

याशिवाय दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात तेथील वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच त्यांच्या सुसाईड नोट मध्ये फक्त तेवढेच नमूद होते. त्यामुळे याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजकिय पध्दतीने तपास करण्यास सांगितले. परंतु माझ्या अनुभवाच्या अनुषंगाने आणि कायदेशीर सल्ल्यानुसार तशा पध्दतीने तपास केला नाही. त्यामुळे याप्रकरणातील तपासाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख हे फारसे खुष नव्हते असा उल्लेखही त्यांनी आपल्या पत्रात केला.

पोलिस आयुक्त पदी असताना मुंबई पोलिसांनी कोणतेही चुकिचे कृत्य केले नाही कि चुकीच्या पध्दतीने तपास केला नाही. तरीही गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या कार्यपध्दतीबाबत जाहिररित्या वक्तव्य केल्याने माझ्या कामाचा आणि ३२ वर्षे पोलिस दलातील सेवेचा अवमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अॅन्टालिया येथील स्फोटक प्रकरणीही गामदेवी पोलिस ठाण्यात तक्रार झाली असून त्याचा तपास अत्यंत योग्य पध्दतीने सुरु होता. मात्र पोलिस तपासात राजकिय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत होता. या हस्तक्षेपावरून मुंबई उच्च न्यायालयाने आणि इतर न्यायालयांनी नेहमीच पोलिसांवर ठपका ठेवला असल्याची खंतही व्यक्त करत देशमुख यांच्या हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली.

सोबत परमबीर सिंग यांचे व्हायरल झालेले पत्र

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *