Breaking News

मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांचा राज्यद्रोह कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी

देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक चालढकल केली. तसेच हे केंद्र गुजरातला जाण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत मुख्यमंत्र्यांनी राज्य द्रोह केल्याचा आरोप केला.

नरिमन पाँईट येथील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते होते.

मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला वेळोवेळी आश्वस्त केले. मात्र प्रत्येकवेळी कधी जमिन अपुरी असल्याचे कारण पुढे केले तर कधी केंद्रामुळे नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अडचण होवू शकते. तसेच जादाचा चटई निर्देशांक (एफएसआय) द्यावा लागेल असे सांगत हा प्रकल्प गुजरातला नेता यावा यासाठीच अशी कारणे पुढे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच हे केंद्र गुजरातला पळवून नेण्यात आल्याने त्याचा परिणाम राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर आणि मुंबईच्या दर्जावर होण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यघटनेत जसा देशद्रोह गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तशी राज्य द्रोह गुन्हा दाखल करण्याची तरतूद असती तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्यद्रोह गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असती असेही ते म्हणाले. यावेळी यासंदर्भात गुजरातचे खासदार रामसिंह राठवा यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना विचालेल्या प्रश्नोत्तराची छापील पत्रही पत्रकारांना दिली.

याचबरोबर मुंबईची वाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे सेवेत वाढ करण्याची गरज होती. त्यादृष्टीने उन्नत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. परंतु केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा प्रस्तावच रद्द करत ७६ लाख मुंबईकरांना जीवघेण्या पध्दतीने प्रवास करण्यास बाध्य केल्याचा आरोपही त्यांनी केला.

वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी रेल्वे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याऐवजी केंद्र पळवून नेण्यासाठी अश्लाघ्य प्रयत्न केल्याची टीका करत याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती संचालक पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या

मुंबई : प्रतिनिधी ठाणे पोलिस आयुक्त व्ही.व्ही.फणसळकर यांना पदोन्नती देत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *