मुंबईः विशेष प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेल्या जातीअंताच्या चळवळीचा वारसा पुढे चालवित मुरबाडच्या एका युवकाने सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत लग्न समारंभात नियोजित वधूचे पुस्तक प्रकाशित करण्याचा आणि उपस्थितांना पर्यावरण संवर्धानासाठी रोप वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करणार आहे.
मुरबाड तालुक्यातील युवक जगदीश भालके हा मुंबई विद्यापीठाचा पदव्युत्तर विद्यार्थी असून तो आता व्यावसायिक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. नेहमी सत्तेत राहीलेल्या समाजात जन्माला येवूनही जगदीशने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच डाव्या चळवळींशी संबधित विविध सामाजिक लढ्यात भाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे डाव्या विचारसरणी बरोबरच महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. या विचारातूनच त्यांने आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला.
याच कालावधीत डाव्या चळवळीतील आदिवासी युवती डॉ. कविता वारे हिच्याशी परिचय झाला. या परिचयाचे पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. डॉ. कवितावरही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव मोठा आहे. कविता हिनेही लग्नाआधी स्वतःला शैक्षणिकदृष्ट्या सिध्द करत महामानवांच्या विचारानुसार जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. येत्या १ डिसेंबर २०१९ रोजी मुरबाड येथे जगदीश व डॉ.कविता हे नियोजित दांपत्य आपले नवजीवन सुरु करणार आहेत.
याच कालावधीत पीएचडी करण्यासाठी सरकारकडून आदिवासी मुलांकरीता चालविण्यात येत असलेल्या शाळांचा विषय निवडला. याविषयावरील प्रबंध सादर करून सरकार पातळीवरील आदिवासी शाळांचे सत्य तीने मांडण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक पाहता लग्न समारंभात पत्नी कशी सुंदर दिसेल, तिच्या अंगावर भरगच्च दागिने किती दिसतील सारख्या पारंपरिक विचारसरणीला जगदीश आणि डॉ.कविताने फाटा देत समाजपयोगी ठरेल अशा “आदिवासी आश्रमशाळांची स्थितीः एक झोत” या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याचाच ध्यास या नियोजित नवदांपत्याने घेतला.
समाजातील स्थितीबरोबर सध्या जागतिक अशा प्रश्नांवरही छोटासा तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांना पर्यावरण रक्षणाची जाणीव व्हावी आणि त्याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकांना एक रोप भेट म्हणून देण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न राहणार आहे. जगदीश आणि डॉ.कविता यांच्यातील संवेदनशील विचार सरणी दिसून येत असून समाजाप्रती काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्या दोघांनी सांगितले.
सामाजिक जाणिवांचे भाव ठेवत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या नियोजित वधु-वरास मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळाकडून खुप खुप शुभेच्छा.
