Breaking News

लोककलावंत सुरेखा पुणेकर यांच्यासह यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाला कार्यक्रम

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोककलावंत सुरेखाताई पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे अशी सूचनाही केली. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुरेखाताईं पुणेकर यांचे मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्यसरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतर‌ही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा‌ सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जाती – धर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही आदरणीय शरद पवारसाहेबांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले.

गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना त्यावेळी देण्यात आली नव्हती. तसेच त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणावर राज्याच्या राजकारणात चर्चाही रंगली होती. यंदा मात्र राष्ट्रवादीकडून आताच विधानसभेची तयारी सुरु केली असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसत अशा लोकलावंत आणि इतर कलाकारांना पक्षात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीच्या काळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *