Breaking News

गृहकर्जासोबतच घ्या घराचा विमा, नुकसानीपासून वाचण्यासाठी आवश्यक या गोष्टी करा घराच्या विम्यासाठी

मुंबई: प्रतिनिधी

आपलं हक्काचं घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. खऱेदी केलेल्या घरात आपली भावनिक गुंतवणूक असते. आपले घर नेहमी सुरक्षित असावे, नैसर्गिक आपत्ती, आग आदी घटनांमध्ये आपल्या घराचे नुकसान होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे अशा नुकसानीपासून वाचण्यासाठी गृहकर्ज घेताना विमा घेणे अत्यावश्यक आहे. गृह विमा असल्यास आपल्या घराच्या नुकसानीची भरपाई मिळते.

सध्याच्या सणासुदीच्या काळात अनेक बँका गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत. सणांमध्ये अनेक जण घर घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे गृहकर्ज घेताना ग्राहकांनी विमाही घ्यायला हवा.  पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा वेळी घराचा विमा असल्यास आपली नुकसान भरपाई भरून निघू शकते. गृह विमा का घ्यायचा आणि त्याचा फायदा काय याची माहिती आपण करून घेणार आहोत.

गृह विम्याचे दोन प्रकार आहेत. अग्नि विमापॉलिसी आणि सर्वसमावेशक विमा पॉलिसी

अग्नि विमा पॉलिसी

– अग्नि विमा पॉलिसीत घराचे पूर, वादळ, शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेली आग यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो. – काही विमा कंपन्याचा विमा हफ्ता जास्त असतो. याचं कारण म्हणजे भूकंप आणि अति पावसामुळे जमिनीचे होणारे भुस्खलन अशा मोठ्या आपत्तीमध्ये गृह विम्याचे अधिक संरक्षण मिळावे यासाठी विम्याचा हप्ता अधिक असतो. 

सर्वसमावेशक गृह विमा पॉलिसी

–  अनेकदा दंगल, हिंसाचार यामध्ये घराचे नुकसान होण्याची शक्यता असते.  जाळपोळ किंवा इतर घटनांमध्ये घराची मोडतोड झाल्यास त्याची विमा मिळण्यासाठी घरातील मालमत्तेचाही समावेश गृह विमा पॉलिसीमध्ये करू शकता.

–  या पॉलिसीत घर, घरातील  सामान, अतिरिक्त जीवनावश्यक वस्तू, वैयक्तिक मालमत्तेची हानी तसंच घरमालकाला होऊ शकणाऱ्या अपघाताचाही समावेश होतो. घराची मोडतोड, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग याचाही समावेश यामध्ये होतो. 

घराचे मूल्य

विमा काढण्यासाठी घराचे मूल्य तीन प्रकारात ठरवले जाते. घरासाठी वापरली जाणारी जागा व तिचे क्षेत्र, इमारतीचे  बांधकाम आणि घराचा परिसर. विमा फक्त बांधलेल्या इमारतीचाच असतो. घराची चालू बाजारभावनूसार किंमत १ कोटी एवढी असेल तर त्यातील ३० लाख एवढी रक्कम फक्त इमारतीची किंमत गणली जाते. त्यामुळे तुमची विमा पॉलिसी तुम्हाला फक्त ३० लाख इतके संरक्षण देते. विमाधारकाला विमा पॉलिसी ही घर बांधल्यावरच काढता येते. गृह विमा घेतलेल्या प्रत्येक विमाधारकाने विम्याची रक्कम, हफ्ता वेळेत आणि नियमितपणे भरला पाहिजे. तरच तुम्हाला गृह विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अनेक विमाधारक थोडी किंवा विम्याची अर्धी रक्कम जमा करतात आणि उर्वरित रक्कम वेळेवर भरत नाहीत. तसंच पॉलिसी मध्येच बंद करतात. अशा परिस्थितीत विमाधारक उर्वरित विमा रकमेस स्वतः जबाबदार आहे, असे विमा कंपनी समजते आणि जेवढी रक्कम विम्यापोटी भरली असेल तेवढीच रक्कम विमाधारकास विमा पॉलिसीची कालमर्यादा संपल्यावर मिळते.

Check Also

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *