Breaking News

अवैध मासेमारांवर कारवाईचे अधिकार मत्स्य विभागाकडे घेणार अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविण्याची मंत्री शेख यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
अवैध मासेमारीला रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करा
अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पोलीस व महसूल प्रशासनास असून हे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे घेण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवस्या मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
१२ सागरी मैल ते २०० सागरी मैल यामध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी केंद्र शासन कायदा करणार आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या कायद्यातही सुधारणा करून अवैध मासेमारी करणाऱ्यांना दंडाची रक्कम वाढविणे, परराज्यातील नौकाना दंड वाढविणे, नौका जप्त करणे या तरतुदी राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या कायद्यात करण्यात येणार असून तशा तरतूदी करण्याच्या सूचना विभागाला त्यांनी केल्या.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी देत मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्यू पडल्यास त्याच्या कुटुंबियांना इतर विभागाच्या धर्तीवर किमान पाच लाख रुपयांची मदत देण्यासंदर्भातचा नवीन योजनेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिले.
अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी तसेच मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत शेख यांनी आज अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी आमदार योगेश कदम, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी एन. मत्स्य विकास आयुक्त राजीव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
अवैध मासेमारी टाळण्यासाठी मासेमारी बंदरांवर राज्य शासनाच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचधर्तीवर मासेमारी बोटींवरही नौका मालकांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.
मासेमारी करताना अपघात झाल्यास मासेमारी संकट निवारण योजनेनुसार एक लाखाची रक्कम, विमा योजनेतून दोन लाख असे तीन लाख रुपयांची मदत मच्छिमारांना दिली जाते. दुर्घटनाग्रस्तांना बंदर विभाग व इतर शासकिय विभागाकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाते. त्या धर्तीवर मृत्युमुखी पडणाऱ्या मच्छिमारांच्या कुटुंबियास पाच लाख रुपये मदत देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मासेमारी नौकांमध्ये इस्त्रोने तयार केलेल्या व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम अथवा ॲटोमेटिक इन्फॉर्मेशन सिस्टीम यंत्रणा बसविल्यास अवैध मासेमारीला आळा घालता येईल. त्यासंदर्भातही विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजनेसाठी नवी समिती नेमणार
पर्ससीन जाळ्याद्वारे होणाऱ्या मासेमारीचा पारंपरिक मासेमारीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. सोमवंशी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील उपाययोजनांचा दर पाच वर्षांनी मूल्यमापन करण्याची शिफारस होती. त्या शिफारशीनुसार नवीन समितीची स्थापना करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना शेख यांनी केली.
ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या वादळामुळे मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. त्याची भरपाई देण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. केंद्रीय समुद्री मासेमारी संशोधन संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार मच्छिमारांच्या मागण्याचा विचार करण्याबाबत शासन विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, श्री. वेलेरियन, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, हर्णेपॉज फिशिंग सोसायटीचे पी. एन. चौगुले, अखिल भारतीय खलाशी संघाचे चेअरमन विश्वनाथ नाखवा, भालचंद्र कोळी आदी यावेळी उपस्थित होते.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *