Breaking News

आयकर विवरणपत्रात दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देणे आवश्यक अन्यथा पडेल महागात

मुंबईः प्रतिनिधी
दिवाळी आणि भाऊबिजेला भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे. तुम्हालाही सणासुदीला भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्यावर आयकर भरावा लागेल. त्यामुळे आयटीआर भरताना तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
दिवाळी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मिळालेली भेटवस्तू ही इतर स्त्रोतांची मिळकत मानली जाते, म्हणजे ‘इतर स्त्रोतांकडून मिळकत’ तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते. त्यामुळेच इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना ही माहिती द्यावी लागते. तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर भरावा लागेल.
आयकर नियमांनुसार, जर तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीची भेटवस्तू मिळाली, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. कधीकधी तुम्हाला वर्षभरात अनेक प्रसंगी भेटवस्तू मिळतात आणि त्याची एकूण किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही हे लक्षात ठेवावे. तुम्हाला ५०,००० रुपयांच्या वरच्या भेटवस्तूंची माहिती आयकरात द्यावी लागेल. जर तुम्ही ही माहिती आयकर विभागापासून लपवली तर तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आयकर कायदा, 1961 च्या कलम 56(2)(x) अंतर्गत, करदात्याला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर लागू होतो.
या भेटवस्तूंवर कर
– ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम चेक किंवा रोख स्वरूपात
– कोणतीही स्थावर मालमत्ता जसे की जमीन, इमारत इत्यादी, ज्याचे मुद्रांक शुल्क रु. ५०,००० पेक्षा जास्त आहे.
– ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने, शेअर्स, पेंटिंग्ज किंवा इतर महागड्या वस्तू.
– ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त कोणतीही मालमत्ता.
नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कर आकारला जात नाही. तुमचे रक्ताचे नाते असलेल्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळाल्यास त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून कोणत्याही मूल्याच्या भेटवस्तू घेऊ शकता किंवा देऊ शकता. तो करपात्र नाही.
या सूट अंतर्गत येणाऱ्या भेटवस्तू पुढीलप्रमाणे
– पती किंवा पत्नीकडून भेटवस्तू
– भावा किंवा बहिणीकडून भेटवस्तू
– पती किंवा पत्नीच्या भावाकडून किंवा बहिणीकडून मिळालेली भेट
– आई-वडिलांच्या भावाकडून किंवा बहिणीकडून मिळालेली भेट
– वारसा किंवा इच्छापत्राद्वारे मिळालेली भेट किंवा मालमत्ता
– कोणतेही जवळचे पूर्वज किंवा जोडीदाराच्या वंशजांकडून मिळालेली भेट
– हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बाबतीत कोणत्याही सदस्याकडून भेटवस्तू.
– पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका समिती आणि जिल्हा मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांसारख्या – स्थानिक प्राधिकरणांकडून भेटवस्तू.
– कलम 10(23C) मध्ये संदर्भित कोणत्याही निधी/फाउंडेशन/विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, – रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्ट किंवा संस्था यांच्याकडून भेट.
– कलम 12A किंवा 12AA अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेट.
तुम्हाला तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून आर्थिक वर्षात मिळालेल्या ५ हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू करमुक्त असतील. परंतु भेटवस्तूचे मूल्य ५ हजारांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम तुमच्या पगारातून मिळकत म्हणून गणली जाईल आणि त्यावर आयकर आकारला जाईल.

Check Also

देशांतर्गत ऑटोमोबाईल विक्रीत वाढ इंडियन ऑटोमोबाईल सियाम संघटनेची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) देशांतर्गत उद्योग १२.५ टक्क्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *