Breaking News

मी दिलेली कागदपत्रे खोटी निघाली तर राजकारण सोडेन : आमचेही पुरखे शुद्रच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मागासवर्गीय असल्याचा दावा खोटा असल्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज आणखी नवी कागदपत्रे ट्विटरद्वारे जाहिर करत वानखेडे यांनी एका मागासवर्गीय मुलाचा हक्क हिरावून घेवून ते अधिकारी बनल्याचा आरोप केला. तसेच जर मी सादर केलेली कागदपत्रे खोटी निघाली तर आपण मंत्रिपद आणि राजकारण सोडेन असे ठाम वक्तव्य मलिक यांनी केले.

नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांचे इस्लामच्या शरीयत पध्दतीने लग्न केल्याचा निकाहनामा आणि समीर वानखेडे यांच्या लग्नातील जोडीचा फोटो ट्विटरवरून शेअर केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकदा तुम्ही मागासर्गीय म्हणून एकदा इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारल्यानंतर तुम्हा अनुसूचित जाती म्हणून मिळणारे सर्व शासकिय फायदे किंवा सवलती संपुष्टात येतात. तशी तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सादर केल्याप्रमाणे ते अनुसूचित जातीतील नाहीत. मात्र नोकरीसाठी त्यांनी मागासवर्गीय असल्याचा खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार अशा पध्दतीचे कोणी कृत्य केले तर त्यास दोन ते ७ वर्षाची शिक्षा मिळते. त्यामुळे जरी मी म्हणालो की त्यांना तुरुंगात पाठविण तरी ते मी घटनेतील तरतूदीनुसार बोलले असून त्यांना मी नाही तर कायदाच तुरुंगात पाठवेल असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात त्याप्रमाणे देशातील सर्वांचे पुरखे हे एकच होते. तर मी म्हणेन की आमचे पुरखे हे ही शुद्र होते आणि आम्ही इस्लाम स्विकारला. आता जर त्यांच्या म्हणण्यानुसार धर्मांतर केल्यानंतरही जर मागासवर्गीय असल्याचे हक्क मिळत असतील तर मोदी आहेत पंतप्रधान त्यांनी राज्यघटना बदलावी आणि द्यावेत सरकारी सवलती असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

समीर वानखेडे यांचा जन्मदाखला जवळपास आम्ही महिना दिड महिना शोधल्यानंतर मुंबई महापालिकेत आपला मिळाला. तो खरा असून तो एक सरकारी कागद आहे. मात्र २० नंतर मात्र समीर दाऊद वानखेडे या नावातील दाऊद या नावाभोवती सर्कल करून तेथे दुसरे नाव लिहिण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर त्यांचा निकाह अर्थात लग्न हे डॉ.शबाना कुरेशी यांच्याबरोबर झाले त्यावेळीही तेच नाव आणि इस्लाम धर्म नोंदविण्यात आल्याचे सांगत त्या निकाह नाम्यातील फक्त मुलीच्या वडीलांचे आणि चुलत्यांचे नाव आणि पत्ता आम्ही लपविला असून त्या कुटुंबियांना सध्या अनेक प्रकारच्या धमक्या आणि त्रास देण्यात येत असल्याने असे केल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *