Breaking News

विरोधकांच्या धमक्या आणि फोन टँपिंगची उच्चस्तरीय चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुडबुध्दीने कारवाई करण्याच्या उद्देशाने फोन टँपिंग करण्यात येत आहे. तसेच सभागृहात भाजपाचे आमदार उघडपणे धमक्या देत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नाना पटोले आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर या दोन्ही प्रश्नांची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभा सभागृहात दिली.

साभागृहाच्या कामकाजाला सकाळच्या सत्रात सुरुवात झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव हे बोलायला उभे रहात म्हणाले की, काल झालेल्या घटनेनंतर सोशल मिडियावरून माझ्याबद्दल अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. त्या पोस्टमधून मला धमक्या देण्यात आल्या. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात राज्यात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे माझ्या जीवीताला धोका आहे. माझ्या संरक्षणाची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल करत मी सुरक्षेविना सर्वत्र फिरत असतो. माझ्या मतदारसंघातील एसपीने यासंदर्भात सुरक्षा घेण्यासंदर्भात पत्रही लिहिले. मात्र मी सुरक्षा घेतली नाही. परंतु कालपासून जो प्रकार सुरु झाला आहे ते पाहता माझ्या सुरक्षेचा प्रश्न मला पडला आहे.

जाधव यांनी मांडलेल्या प्रश्नांनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही काहीजण याला ईडी लावतो, त्याला ईडी लावतो सीबीआय लावतो अशा आशयाची वक्तव्ये विरोधी पक्षातील सदस्यांकडून ऐकायला मिळतात. या सर्व सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सभागृहाच्या अध्यक्षांची आहे. केंद्रीय यंत्रणामार्फत विधानसभेच्या सदस्यांचे फोन टँप करण्यात येत आहेत. या पध्दतीने सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून याची गृहमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली.

त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नाना पटोले यांनी बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले की, काल कामकाज सुरु असताना आपल्या भाषणा दरम्यान भाजपा सदस्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. तसेच आता साखर कारखान्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रारही केली आहे. या तक्रारीच्या नावाखाली महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टँप करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अशी परवानगी मागणारे प्रस्ताव गृहविभागाकडे येतात का? असा सवाल उपस्थित करत जर येत असतील त्यास कशाच्या आधारे परवानगी देण्यात येते अशी विचारणाही त्यांनी केली.

यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी निवेदन करावे अशी सूचना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली.

त्यावेळी बोलताना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, फोन टँपिंगसाठी परवानगी मागणारे प्रस्ताव गृह विभागाकडे येत नाहीत. ते खालच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या स्तरावरच निर्णय होतात. त्यामुळे कोणाचे फोन टँप करण्यात येतात याविषयी काही कळत नाही.

त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारकडे असल्याने सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. विरोधकांनी दिलेले इशारा, धमक्यांची आणि फोन टँपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहासमोर ठेवण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *