Breaking News

सत्ताधारी म्हणाले जलदगतीने न्याय देणार तर विरोधकांकडून कठोर न्यायाची मागणी पीडीत जखमी तरूणीने घेतला सकाळी ६.५५ मिनिटांनी अखेरचा श्वास

मुंबईः प्रतिनिधी
हिंगणघाट तालुक्यातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीत प्राध्यापिकेची अखेर मृत्यूशी झुंज संपल्याने याप्रकरणातील हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सदर प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा यासाठी यंत्रणांना निर्देश देत मृत प्राध्यापिकेला आदरांजली वाहिली. तसेच इतर मंत्र्यांनी आरोपीस कठोर शासन होईल असे आश्वासन दिले.
जलदगतीने न्याय मिळावा म्हणून यंत्रणांना निर्देश – मुख्यमंत्री
हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले.
महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्राच्या मातीला लाजिरवाणी घटना – उपमुख्यमंत्री
हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यातून आणि नंतर मृत्यूमधून आपण वाचवू शकलो नाही ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे अशा शब्दात आपला संताप राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे असेही आवाहनही त्यांनी केले.
जळीतकांडातील पीडितेचा दुदैवी मृत्यू ही दु:खद बाब-गृहमंत्री
जळीतकांडातील पीडितेचा आज दुदैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद बाब आहे. सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनी देखील सर्व प्रयत्न केले. मात्र दुदैवाने पीडितेला वाचवण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहिल असा विश्वास व्यक्त करत सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि मी तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दिशेने उज्ज्वल निकल काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्या नराधमाला कडक शासन होईल – जयंत पाटील
ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर वेळ आणली त्याला कडक शासन होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
हिंगणघाटमधील युवतीवर ज्या नराधमाने ही वेळ आणली त्या नराधमाने कडक प्रायश्चित्त करावं, ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या नराधमावर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त करत मागच्या काळात अशा गंभीर दोन- तीन घटना घडल्या आहेत अशा मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून कडक कारवाई होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
… तर राज्यात अराजकता निर्माण होईल-विरोधी पक्षनेते दरेकर
हिंगणघाट जळीत कांडातील पिडितेचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुखद, धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेन खाली गेली आहे. आम्ही पिडितेच्या कुंटूंबियांच्या दुखात सहभागी आहोत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. अश्या घटना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल आहे. जर हे सरकार महिलांच्या विरोधात घडणा-या दुदैर्वी घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर राज्यात अराजकता निर्माण होईल अशी संतप्त प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होताना दिसत आहे. पनवेल, मीरारोड, जळगाव, सिल्लोड याठिकाणी झालेल्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. या घटनेनंतर जनता रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवर सातत्यांने होणाऱ्या या घटनांमुळे हे सिध्द झाले आहे, कि परिस्थिती या सरकारच्या हाता बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला.
मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी- विरोधी पक्षनेते फडणवीस
हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो.
ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.
न्यायालयात खटला चालवून आरोपीला देहदंडाची शिक्षा द्या- मुंडे
हिंगणघाट येथील शिक्षिकेच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त करत या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करून हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यु झाला .. सुन्न आणि अपराधी वाटत असल्याचे म्हटले आहे. इतक्या शतकांत आपण स्त्री ला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरंक्षण मंत्री पाहू शकलो पण सामान्य स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्री ला सुरक्षा नाही देऊ शकलो.. देहदंडाची दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला.. तिच्या परिवाराचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे.. ते कधीही न भरून येणारे आहे .. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Check Also

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *