Breaking News

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा, म.फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन वाढविली-विधानसभेत

महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, २३ सप्टेंबर २०१८ पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून नि:शुल्क गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या हेतूने राबविण्यात येते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचार सामायिक असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींसाठी अतिरिक्त २१३ उपचार मिळून एकूण १,२०९ उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच २ जुलै २०१२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ॲलोपॅथीमध्ये ५१ लाख ९० हजार उपचार आणि १० हजार ३३० कोटी रुपये रुग्णांना अदा करण्यात आले आहेत.

एकत्रित योजनेमध्ये रुग्णांना गंभीर, गुंतागुंतीच्या आणि तातडीच्या आजारांवर उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या हेतूने ३४ विशेषज्ञ सेवांमध्ये द्वितीय आणि तृतीय स्तराचे वैद्यकीय उपचार आणि विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे. एकत्रित योजनेमध्ये ॲलोपॅथी उपचारांचा समावेश करण्याबाबत निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात आला असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *