Breaking News

कोरोनामुळे अंधत्व अर्थात म्युकरमायकोसीसवरील १ लाख इंजेक्शनची खरेदी करणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनामुळे अंधत्व आणि बुरशीयुक्त आजारग्रस्तांना अर्थात म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री टोपे बोलत होते.

राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते. सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोवीशिल्डचे देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून विविध जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इथेनॉल प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशीव साखर कारखान्याने केला असून या कारखान्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दररोज ४ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पुरविता येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नुतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन मेडीकल असोशिएशनच्या माध्यमातून याबाबत मागणी करण्यात आली होती. मधुमेह नियंत्रीत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेल्या इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकीनकडे मागणी नोंदविण्यात आली असून ती दिवसांची निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रीया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *