Breaking News

गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर

गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली.

मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली.

डॉ. सावंत यांनी सांगितले की, लसीकरण न झाल्याने बालकांना गोवर होत असल्याचे प्राथमिक स्तरावरील सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे गोवरचा संसर्ग असलेल्या भागात प्रामुख्याने लसीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबरीने उर्वरित भागातील बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. मुंबई शहरातील ठराविक प्रभागातच गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागात 1 डिसेंबरपासून विशेष मोहिम राबवली जाणार आहे. लसीकरणासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच लसीकरण करुन घ्यावे यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे.

मुंबई बरोबरच राज्यातील २६ ठिकाणी गोवरचा संसर्ग आढळून आला आहे. या सर्व ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांकडून सर्व्हेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. या भागात लसीकरण वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. संशयित लक्षणं असलेल्या बालकांच्या तपासणी करण्यात येत असून, आवश्यकता भासल्यास तत्काळ दवाखान्यात दाखल केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

गोवर या आजारासाठी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाकडूनही माहिती संकलित केली जात आहे. गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची, मुलांची माहिती तत्काळ आरोग्य विभागास दिली जावी, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

गोवर प्रतिबंधात्मक औषधे, अ जीवनसत्त्वाची मात्रा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. राज्यातील विविध विभागांतील आढावा घेतला असता सर्वत्र औषधे आणि लसी उपलब्ध आहेत, असेही मंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसू लागतात ही लक्षणे मधुमेह टाळण्यासाठी काय करावे

मधुमेह होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *