राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने येत्या आज १० फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाला असून, राज्य स्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
देशात २० राज्यांतील ३४८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग (लिम्फ्याटिक फायलेरियासिस) या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशामध्ये १९५७ पासून विविध जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशामुळे हत्तीरोग या आजाराचे ७ राज्यांतून दुरीकरण शक्य झाले आहे. हत्तीरोग हा दुर्लभ आजार आहे. दूषित क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे हा आजार होतो. याचे प्रदूषित पाण्यात प्रजनन होते.