Breaking News

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई या संस्थेच्या मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला.

मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. तसेच सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, मुख शल्यचिकित्साशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. अशोक डबीर, महाराष्ट्र राज्य मुख शल्यचिकित्साशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण शेनॉय यांच्यासह मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारी २०२५, रोजी शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात येणाऱ्‍या टाक्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा तसेच मुख कर्करोगावरील जनजागृतीसाठी व्हिडिओ आणि पोस्टर बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी विभागाने मरिनड्राईव्हच्या परिसरात मुखकर्करोगाची आणि तंबाखूच्या हानिकारक परिणामांची जनजागृती करण्यासाठी एका वॉकथॉन कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच माहिती पत्रिकांचे वितरण केले.

तसेच १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुखकर्करोगाची तपासणी व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबीरामध्ये एक हजार ७७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये टॅक्सीचालकांचे समुपदेशन करुन तंबाखू सेवनाने होणाऱ्‍या आजारांबाबत माहिती देवून मुख शल्यचिकित्साशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमार्फत प्राप्त ध्वनीचित्रफित देखील शिबिरादरम्यान प्रदर्शित करुन जनजागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाचे आयोजन मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अभिलाषा यादव यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *