भांडुपमधील महापालिका रुग्णालयात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करून गर्भवती आणि बाळाच्या मृत्यूचा चौकशी अहवाल जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना वारंवार आदेश देऊनही सादर न केल्याबद्दल तसेच न्यायालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सपाळे यांच्यावर न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, दोन आठवड्यांत या मृत्यूचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
भांडूप महापालिका रुग्णालयातील गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचा चौकशी अहवाल सादर करण्याबाबत दोनवेळा आदेश दिले होते. पंरतु, तो अद्याप का सादर केला गेला नाही याचे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी खुद्द न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, जेजेच्या अधिष्ठाता मंगळवारच्या सुनावणीला न्यायालयात उपस्थित झाल्या, तेव्हा, रुग्णालयाच्या अधिष्ठाता सपाळे या न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत एवढ्या उदासिन का, अशी विचारणा न्या. रेवती डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने केली.
त्यावेळी, त्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखतींमध्ये व्यग्र असल्याचा दावा सपाळे यांच्याकडून करण्यात आला. दुसरीकडे, घटनेचा चौकशी अहवाल अद्याप का सादर केले गेला नाही याबाबतही न्यायालयाने सरकारी वकिलांकडे विचारणा केली. त्यावर, चौकशीसाठी आवश्यक ती सगळी कागदपत्रे अद्याप अधिष्ठात्यांकडे सादर केली नाहीत. शिवाय, योग्य सुसंवादाच्या अभावामुळे हे झाल्याची कबुलीही दिली. त्यावर नाराजी व्यक्त करून चौकशीसाठी आवश्यक सगळी कागदपत्रे अधिष्ठात्यांकडे जमा करण्याचे आणि दोन आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रकरण काय ?
भांडुप पश्चिम येथील महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज रुग्णालयात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात याचिकाकर्ता खुसरूद्दीन अन्सारीची गर्भवती पत्नी शहिदान्निसावर शस्त्रक्रिया केल्यामुळे तिच्यासह त्यांच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाला. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यापासून करण्यात आलेले उपचार, शस्त्रक्रिया, दुसऱ्या रुग्णालयात हलविल्यानंतर तिचा झालेला मृत्यू या सगळ्यांशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे आणि वैद्यकीय नोंदी उपलब्ध कराव्यात यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे करून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पत्नीच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे, या माहितीशिवाय आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे, याचिका केल्याचा दावा अन्सारीने याचिकेत केला आहे.
दरम्यान, रुग्णालयातील जनरेटर कार्यरत कसे नव्हते ? प्रसूती रुग्णालयांची नियमित तपासणी होते का ? अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केली होती. त्यावर, रुग्णालयात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात याचिकाकर्त्याच्या पत्नीवर शस्त्रक्रिया केली नाही व त्यांचा मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. याचिकाकर्त्याच्या पत्नीची प्रसूती होईपर्यंत शस्त्रक्रियागृहातील दिवे व्यवस्थित होते. प्रसूती झाल्यानंतर दिवे एका मिनिटांसाठी गेले. रूग्णालयातील जनरेटर ऑटो मोडवर नसल्याने एका मिनिटासाठी अंधार झाला.. संबंधित विद्युत अभियंताला त्यानंतर कारणे दाखवा बजावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता.