Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” आवाहनानंतर मंत्री अस्लम शेख यांचा निर्बंधाबाबत मोठा इशारा पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नियमात शिथिलता आणत निर्बंधमुक्त केले. त्यास आता जवळपास दोन-तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे.

यापार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले. आता त्यापाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री तथा मत्स व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी रूग्णसंख्येत जर एक हजाराने वाढ झाली तर पुन्हा निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तविली आहे.

वाचा

कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत ३०० चा टप्पा ओलांडल्याने कोरोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाट येऊ शकते, असे भाकित वर्तविले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की, त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.

ज्या पद्धतीने करोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ७० टक्के लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळालेली नाही. १६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरण सुरू झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फ्रन्टलाईन वर्कर, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांपासून १२ वर्षांच्या बालकांची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

राज्यात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांच्या गटातील सर्वाधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *