देशात कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः महिलांमधील कर्करोग आजाराचे प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी लसीची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे कॅन्सरची लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली असून ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कर्करोगाच्या लसीबाबत एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांची हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाणार असून कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहे. कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमा शुल्कही माफ करण्यात आल्याचेही सांगितले.
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, या पार्श्वभूमीवर “महिलांच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांत लस उपलब्ध होणार आहे. ९ ते १६ वयोगटातील मुली या लसीसाठी पात्र असतील. लसीवरील संशोधनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. चाचण्या सुरू आहेत. देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकार या समस्येकडे तातडीने पावले उचलत आहे”, असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, याशिवाय, रुग्णालयांमध्ये आयुष विभाग आहेत. लोक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. देशात अशी १२ हजार ५०० आरोग्य केंद्रे आहेत. सरकार त्या केंद्रात वाढ करत आहे. ही लस कर्करोगाबाबत दिलासादायक बाब आहे. विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. या लसीमुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत, असेही यावेळी सांगितले.