Breaking News

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या गट-ब(अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या १०० टक्के मर्यादित पदे शासनाच्या विहीत धोरणाचा अवलंब करुन भरण्यास शासनाच्या १७ मे २०२१ रोजीच्या पत्रान्वये मान्यता प्रदान करण्यात आली होती.यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवेची पदे भरण्याकरीता ५ कंपन्या निर्धारीत करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या गट-ब (अतांत्रिक) व गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या पदांची परीक्षा न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ असलेल्या गट-क संवर्गाच्या पदांची परीक्षेमध्ये न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लि. या कंपनीने केलेल्या गैरवापर विचारात घेऊन सदर कंपनीमार्फत पदभरती करण्यात आली नाही.

सामान्य प्रशासन विभागाच्या २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याची प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यास २४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता प्रदान करण्यात आली असल्याचे महाजन यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झालेली आहे अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त निमित्ताने वरील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणतः ४ हजार ५०० पदे भरण्यात येणार आहे.या पदांमध्ये मुख्यत्वे तांत्रिक उदा.तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक इ. व अतांत्रिक उदा.उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. ही पदे भरण्यात येणार आहेत. सदर पदभरती बाबतची जाहिरात दोन महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार असून सदर पदभरती प्रक्रिया ६ महिन्यात पूर्ण करण्याचे विभागाने नियोजन केलेले आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

Check Also

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/नुतनीकरण ऑनलाईन होणार

प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *