मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोविडचा नवा व्हेरिएंट असलेल्या एच१एन१ विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गत कोविड काळातील परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये याची तपासणी करण्याच्या उद्देशाने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहे याची पाहणी करण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी कोविड मॉक ड्रील केले जाणार आहे. दहशतवादी हल्ला झालाच तर तो परतवून लावण्यासाठी आपण सक्षम आहोत का याची खात्री करण्यासाठी मॉक ड्रील केले जातात. तीच पध्दत आता कोविडसाठी आपण किती सज्ज आहोत हे पाहण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यातून रुग्णालये किती तयार आहेत हे सुध्दा स्पष्ट होणार आहे.
कोविडसंदर्भात काल गुरूवारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्यांवर तज्ज्ञ मंडळींनी पुढीलप्रमाणे आपली मते मांडली तसेच काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या.
– फेब्रुवारीच्या मध्यावधीपासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी रुग्णसंख्येचा विचार करून रुग्णालयांना पुढील स्थितीसाठी तयार रहायला हवे.
– श्वसनाचा गंभीर त्रास असलेल्या व्यक्तींची कोविड चाचणी वेळीच केली पाहिजे. जेणेकरून कोणत्या विभागांमध्ये कोविड रुग्ण आहेत याचा अंदाज घेता येईल आणि चाचण्या वाढवता येतील.
– सर्व रुग्णालयांनी औषधे, बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सीजन यंत्रणा, मनुष्यबळ यांची सज्जता करून ठेवावी.
रुग्णालयांनी माहिती देण्यासाठी महापालिकेचा तगादा
रुग्णालये कोविडचा सामना करण्यासाठी कितपत सज्ज आहेत त्याची संपूर्ण माहिती रुग्णालयांनी तातडीने द्यावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तगादा लावला आहे. मॉक ड्रीलमध्ये कोणतीही उणीव समोर येऊ नये यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
मुंबईची स्थिती
१५ महापालिका रुग्णालये, ३ सरकारी रुग्णालये आणि ३५ खासगी रुग्णालयांमध्ये पुढीलप्रमाणे बेडची व्यवस्था आहे.
– आयसोलेटेड बेड्स – १९९५
– ऑक्सीजन बेड्स – १३१६
– आयसीयू बेड्स – ७११
– व्हेन्टीलेटर्स – ६४९
– एकूण बेड्स – ४०२२
मनुष्यबळ
डॉक्टर्स – १४१३
– परिचारीका – ३८८०
– पॅरामेडिकल – १२५०
– एकूण – ६५४३
उपलब्ध अॅम्ब्युलन्स – १८१
– रोज चाचण्यांची क्षमता – १३५०३५
– उपलब्ध औषधे
रेमडेसीवीर, टोसिलीझुमॅब, डेक्सामेथॅसोन, अॅम्फोटेरीसीन बी डियोक्सीकोलेट, पोसॅकोनॅझोल, मेथीलप्रेडनिसोलोन
– ३२०५ मेट्रीक टन ऑक्सीजनची दररोजची क्षमता