Breaking News

बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केल्या या उपाययोजना ठाणे जिल्ह्यात वेहलोळी वगळता अन्यत्र बर्ड फ्लूची लागण नाही पशुसंवर्धन आयुक्तालयाची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली येथे बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील १ किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात १७ फेब्रुवारी २०२२ रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये ३०० कुक्कुट पक्षी आणि ९ बदकांमध्ये मरतुक आढळून आली आहे. नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्यांचे तपासणी निष्कर्ष १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून, नमूद ठिकाणावर एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच५एन१ या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आले असल्याचे केंद्र शासनाने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिकृतरित्या कळविले आहे. पशुरोग अन्वेषण विभागाचे पथक शहापूर येथील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेले ठिकाण “संसर्गग्रस्त क्षेत्र”घोषीत

या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी या क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषीत केले असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार वेहलोळी या ठिकाणच्या बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून पथकाच्या देखरेखीखाली २३ हजार ४२८ कुक्कुट पक्षी, १ हजार ६०३ अंडी, ३ हजार ८०० किलो खाद्य आणि १०० किलो शेल ग्रीट नष्ट करण्यात आले आहेत. या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्व जिल्ह्यांमधील क्षेत्रिय यंत्रणांना आवश्यक सतर्कता बाळगण्याचे व चौफेर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ तसेच कॉल सेंटर क्र.१९६२

या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मरतुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मरतुक झाल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर क्र. १९६२ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४ (१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.

अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय

बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यात दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतू अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *