Breaking News

सेरोप्रिव्हेलन्स संशोधनानुसार १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आवश्यक दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये अँटिबॉडीज सेरोप्रिव्हेलन्सचं प्रमाण ९२ टक्के, तर लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये फक्त ६८ टक्के

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी संशोधनाबाबत लोकसंख्या/समुदायातील प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यास महत्त्वाचा आणि आवश्यक होता. SARS-CoV-2 संसर्ग, संसर्गासाठी लोकसंख्या आधारित निर्देशक आणि साथीच्या रोगांवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी समुदायाच्या प्रतिसादाचे मोजमाप करण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आयसीएमआर या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात covid-19 सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले व या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करून दिली होती. वैद्यकीय महाविद्यालयांनी या प्रकल्पाच्या अहवालातील निष्कर्षानुसार जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

  जिल्ह्यात अठरा वर्षावरील नागरिकांचे लसीकरण १०० टक्के झाल्यास पुढील ३ फायदे होतील-

  1. कोवीड साथीचा प्रसार कमी होईल
  2. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होईल
  3. मृत्यू दर कमी येईल.

तसेच दुसऱ्या अर्थाने प्रशासनाला लॉकडाउन करण्याची गरज पडणार नाही. लोकांची बेड साठी, ऑक्सिजन साठी, रेमेडीसिवीर साठी धावपळ होणार नाही. कोणतेही निर्बंध नागरिकांवर लादण्याची गरज पडणार नाही.

जिल्ह्यात सेरोप्रिव्हेलन्स च्या अनुषंगाने एक सप्टेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अभ्यास करण्यात आला. जिल्ह्याच्या ११ तालुक्‍यातील ३ हजार १८७ व्यक्तीने या संशोधनात सहभाग घेतला. राष्ट्रीय सेरोप्रिव्हेलन्स च्या मार्गदर्शक तत्वानुसार क्लस्टर संपलींग द्वारे प्रत्येक तालुक्यातून २९० व्यक्तींची निवड करण्यात येऊन त्यांच्या संमतीने अभ्यासात नाव नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ११० नमुन्यांचे नमुना संकलनावर वाहतूक आणि अखंडता समस्यांमुळे प्रक्रिया होऊ शकली नाही. अशाप्रकारे एकूण ३ हजार ७७ रक्त नमुन्यावर प्रक्रिया करण्यात आली आणि त्याचे विश्लेषण केले गेले. या संशोधनासाठी डॉक्टर व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या व संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे प्रशिक्षण झाले. बायोकेमिस्ट्री विभागाने सर्वेक्षण मध्ये प्राप्त झालेल्या रक्ताच्या नमुन्याचे गुणात्मक आणि परिमाणात्मक विश्लेषण केले.

संशोधनातील निष्कर्ष:-

२० सप्टेंबर २०२१ ते १६ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत केलेल्या विभागीय सेरो सर्वेक्षणात सोलापूर जिल्ह्यात SARS COV 2 संसर्गाचा एकूण सेरोप्रिव्हेलन्स ८३.२ होता.

सोलापूर जिल्ह्यातील सेरोप्रिव्हेलन्स चे प्रमाण पुरुषांमध्ये ८३.५ टक्के तर covid-19 महिलांमध्ये ८२.९ टक्के आहे. लिंगानुसार सेरोप्रिव्हेलन्स मध्ये महत्त्वपूर्ण फरक नाही.

सोलापूर जिल्ह्यातील covid-19 सेरोप्रिव्हेलन्सचे प्रमाण ४५ ते ६० वयोगटातील लोकांमध्ये SARS COV 2 ऑंटीबॉडीज चा सर्वाधिक प्रसार दर्शवतो, जो ८७ टक्के आहे. त्यानंतर ६० वर्षावरील लोकांमध्ये ८४.१ टक्के तर १८ ते ४४ वयोगटात ते प्रमाण ८१.१ टक्के आहे तर हे सेरोप्रिव्हेलन्स चे प्रमाण १० ते १७ वयोगटात सर्वात कमी म्हणजे ६२.३ टक्के आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटीबॉडीजचे सेरोप्रिव्हेलन्स प्रमाण ८२.८ टक्के आहे तर नागरी भागात (नगरपालिका, नगरपंचायत) ८७.२ टक्के आहे. ग्रामीण व नागरी भागामध्ये सेरोप्रिव्हेलन्स मध्ये संख्यात्मक दृष्ट्या जास्त फरक नाही.

जिल्ह्यातील covid-19 SARS COV2 IgGऑंटीबॉडीज सेरोप्रिव्हेलन्स प्रमाण covid लसीकरण स्थितीशी सांख्यिकीदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध दर्शवते. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्ती मध्ये  सेरोप्रिव्हेलन्स ९२.५ टक्के तर फक्त एक डोस घेतलेल्या व्यक्ती मध्ये ८५.६ टक्के आहे. ज्या व्यक्तीने कोणतीही लस घेतली नाही त्यांच्यामध्ये अँटीबॉडी चे सेरोप्रिव्हेलन्स  केवळ ६८.५ टक्के आहे. हा फरक सांख्यिकी दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लसीकरण चे प्रमाण सुधारणे व शंभर टक्के करणे तसेच लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणेच कोविड लसीकरण प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल पाळणे महत्त्वाचे असून लसीकरण न झालेल्या व्यक्तींना covid-19 गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक आहे.

सध्याच्या अभ्यासात एक किंवा अधिक सहव्याधी असणाऱ्या ८६.२ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये सेरोप्रिव्हेलन्स चे प्रमाण ८५.८ टक्के आहे तर ज्यांना मधुमेह झाला आहे त्या व्यक्तीमध्ये ९०.५ टक्के आहे. तसेच इतर सहव्याधी  असणाऱ्या व्यक्तींमध्ये सेरोप्रिव्हेलन्स चे प्रमाण ७८.९ टक्के आहे.

पूर्वी covid-19 लोकांमध्ये SARS COV2 IgG ऑंटीबॉडीजचे प्रमाण ९७ टक्के आहे तर ज्यांना गेल्या महिन्यात फ्लू सदृश्यची लागण झाली होती. त्यांच्यामध्ये हे प्रमाण ८६.२ टक्के आहे.

संशोधनांतून आलेल्या शिफारशी

लसीकरण व्याप्ती वाढवली पाहिजे, लसीकरण जेवढे जास्त प्रमाणात राहील तेवढे सेरोप्रिव्हेलन्स प्रमाण जास्त राहील कोविड चा धोका कमी होईल.

मास्कचा नियमित व योग्य वापर, सामाजिक अंतर व हाताची स्वच्छता यासारखे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे.

१० ते १७ वयोगटातील लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू करणे.

संशोधन समिती

उपरोक्त संशोधन करण्यासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या निर्देशानुसार अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यासह डॉक्टर रमाकांत गोखले, डॉक्टर कमलाकर माने, डॉक्टर शीतलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संतोष हरकळर, डॉक्टर पूनम संचेती, डॉक्टर अमितकुमार पाटील, डॉक्टर स्वाती सावंत, डॉक्टर नीलिमा गुप्ता यांनी संशोधन कामकाज पाहिले.

जिल्ह्यात SARS COV2 IgG ऑंटीबॉडीज सेरोप्रिव्हेलन्स समुदाय आधारित cross-sectional अभ्यास ICMR मार्गदर्शक तत्वानुसार करणे गरजेचे होते. त्यानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाच्या यंत्रणेची संशोधन अभ्यास गट नियुक्त करण्यात आला. या गटाने नुकताच अहवाल सादर केलेला आहे. त्यातील निष्कर्षानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये सेरोप्रिव्हेलन्स ९२.५ टक्के तर फक्त एक डोस घेतलेल्या व्यक्ती मध्ये ८५.६ टक्के आहे. ज्या व्यक्तीने कोणतीही लस घेतली नाही त्यांच्यामध्ये अँटीबॉडी चे सेरोप्रिव्हेलन्स  केवळ ६८.५ टक्के आहे. जिल्ह्यातील १८ वर्षा पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे असून प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *