Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा, “बेसावध राहू नका, ऑक्सीजन वापराचे प्रमाण वाढतेय” जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवा-मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठी ई-बातम्या टीम

गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली.

राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे ४०० मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. युके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाने सादर केलेल्या सादरीकरणात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रूग्णांच्या ऑक्सीजन वापरातही मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याची चिन्हे असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा इशारा दिला असून सध्या ४०० मेट्रीक टन ऑक्सीजनचा वापर सुरु झाला आहे. हा वापर ७०० मेट्रीक टन वापरापर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून जर ७०० मेट्रीक टनापर्यंत वापर वाढल्यास राज्यात लॉकडाऊन अटळ असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी बेसावध न राहता काळजी घ्यावी असे आवाहन मराठी ई-बातम्याकडून वाचकांना आणि राज्यातील जनतेला करण्यात येत आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *