Breaking News

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याची अंदाजित आकडेवारी असून त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

‘सिरो सर्व्हेलन्समध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टेटसची तुलना केली जाते. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोक बाधित झाले आहेत, त्याचा सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट देशस्तरावर आलेला आहे, त्यात कमी बाधित केरळ आहे ४२ टक्के त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्र आहे. परंतु मध्यप्रदेश ८९ टक्के बाधित आहे, असे अहवालातून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

लहान मुलांच्या संदर्भांने पहिल्या व दुसऱ्या लाटेची बाधित टक्केवारी ही ८ ते १० टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत लसीकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली, आमचा पाठपुरावा लक्षात घेता केंद्राने सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख डोसेस देण्याचं मान्य केलं आहे. ५० लाख डोसेस जास्तीचे मिळतील त्याचा उपयोग लसीकरणासाठी होईल, एक नक्की आहे पहिला डोस दिला की दुस्ऱ्या डोसला प्राधान्य नागरीकांकडून दिला जातो, येणाऱ्या ज्या लसी असतील त्या अशा फॉर्म्युल्याने वितरित केली जाईल, ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल. तिसऱ्या लाटेसाठी लसीकरण हा रामबाण उपाय असून लसीकरणाला गती दिली तर तितकी गंभीरता राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

तिसरी लाट अमेरिका, युके, रशिया इथे सुरु आहे, त्यात मृत्यूदर उतरतो आहे, लसीकरणाचा परिणाम यावर असू शकेल, महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात किमान ५२ टक्क्यांपर्यंत लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे, उरलेले ४८ टक्के लोकसंख्येला लस लवकर देण्याची योजना आहे. तसेच राज्यात कोरोनाचा कोणताही मृत्यू कधीच लपवलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेच्या संदर्भातही आज मंत्रीमंडळात चर्चा झाली, केरळच्या पार्श्वभूमीवर जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली, त्याचा परिणाम जाणवतो आहे. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोललो, ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय? आणि केरळपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजायचे का? असे विचारले असता त्यांनी ओणम सणामुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविली असल्याने संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितल्याचे टोपे यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्याने पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्यात केंद्र शासनाने जे सांगितले की जून महिन्यात तिसरी लाट येऊ शकेल त्याची संख्या ६० लाख लोक बाधित होऊ शकतील, आणि त्याच्या टक्केवारीत १२ टक्के ऑक्सिजन लागतील असा अंदाज असून दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ही जी आकडेवारी आहे त्याला धरून तयारी करीत असल्याचे ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून १०० टक्के रिक्त जागा भरतो आहे. २५ आणि २६ ला वर्ग क आणि ड वर्गाच्या भरती परीक्षा घेतो आहोत. १२०० डॉक्टर्स घेतो आहोत, ५ सप्टेंबरच्या अगोदर त्यांचे समुपदेशन होऊन त्यांना आदेश दिल्या जातील. सुपर क्लास वन यांना एमपीएससीकडून भरतो आहे. अ, ब, क, ड वर्ग रिक्त पदे भरतो आहे. ऑक्सिजन १२०० ते १३०० मेट्रिक टन पूर्वी उपलब्धता असायची आता २००० मेट्रिक टन पर्यंत वाढवली आहे. जुलैच्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करून घेतली आहे, औषधे, आवश्यक उपकरणे घेतली जातील. एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या, ५०० रुग्णवाहिका दिल्या आहेत तर उर्वरित ५०० सप्टेंबरअखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत त्या जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील.एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने जो प्रस्ताव पाठवला आहे, ५ हजार कोटींचा, त्यात आपल्या आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत …

Leave a Reply

Your email address will not be published.