मागील काही महिन्यापासून राज्यातील विविध भागात सरकारी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचे किंवा त्यांना त्यांना उलट्या जुलाब, मळमळ होणे आदी प्रकार घडताना उघडकीस आले आहे. त्यातच चंद्रपूरातील सरकारी शाळेत मध्याह भोजनामुळे जवळपास ९६ शालेय विद्यार्थी आजारी पडले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा तर झाली नाही ना म्हणून अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात येत आहे.
दरम्यान आजारी पडलेले विद्यार्थी हे पहिली ते सातवीच्या वर्गातील असून पार्डी या गावात शिक्षणासाठी जातात. हे विद्यार्थी आजारा पडल्याने त्यांना त्यांच्या पालकाकडून वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांबरोबर मध्यांन्ह भोजन तयार करणारा स्वयंपाकीही आजारी पडला आहे.
शाळेत ज्या ९६ विद्यार्थ्यांनी खिचडी खाली आणि घरी गेले त्यानंतर रात्री अचानकपणे उलट्या जुलाबाचा त्रास सुरु झाला. आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना सदर विद्यार्थ्यांना तातडीने सावली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयातील मर्यादीत क्षमतेमुळे विद्यार्थ्यांना इतर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काही जणांना गडचिरोली येथील रूग्णालयात हलविण्यात आले.
यासंदर्भात सिव्हिल सर्जन डॉ महादेव चिंचोले यांनी दिलेल्या माहितीनुसार बाधित विद्यार्थ्यांची संख्या ९६ पर्यंत पोहोचली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. विद्यार्थ्यांच्यावर तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. घटनेच्या प्राथमिक तपासात मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी दिली.
काही महिन्यापूर्वी मराठवाड्यातील एका जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी ५० हून अधिक विद्यार्थ्यांना रूग्णालयात तातडीने दाखल करावे लागले होते. त्यामुळे त्यांचे पालक चांगलेच हवालदील झाले होते.