Breaking News

आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ करणार हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी
दिवसेंदिवस निसर्ग आणि हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्याकरिता राज्यस्तरीय नियामक मंडळ आणि टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री या मंडळाचे अध्यक्ष असून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्याचे उपाध्यक्ष आहेत. संचालक आरोग्य सदस्य सचिव असून राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागीय संचालक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय नियामक मंडळाची बैठक वर्षातून एक वेळा घेण्यात येईल. तर टास्क फोर्सची बैठक वर्षातून तीन वेळा घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असून जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे सदस्य, जिल्हा कृषी अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
टास्क फोर्स करणार हवामान आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
टास्क फोर्स मार्फत हवामान बदलाचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य आणि जिल्हा टास्क फोर्सवर असणार आहे. त्यामध्ये हवामान बदलामुळे होणारे आजार ओळखणे, त्यांचे सर्वेक्षण करुन जोखीम निश्चित करणे, जोखीमग्रस्त भाग व लोकसंख्या निश्चित करुन त्यानुसार कार्ययोजना आखणे, उपलब्ध संसाधनांची यादी करणे आदी बाबी टास्क फोर्स करणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जिल्हास्तरावर वातावरण बदलाच्या अभ्यासकरिता नोडल अधिकारी नेमण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा पर्यावरणीय आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात येईल. राज्य पातळीवरील कक्षाप्रमाणेच त्याची रचना राहणार असल्याचे विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *