Breaking News

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून त्या मेलवर नाव ई-मेल केल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक घरी येवून लस देणार आहे.

अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvacc2bedridden@Gmail.com  या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथका मार्फत करणे सोयीचे होईल.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

त्यामुळे आता घरबसल्या या रूग्णांना कोरोनाची लस मिळणार असल्याने रूग्णांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना लसीकरण केंद्रापर्यत घेवून जायचे याचा तणावही नाहीसा होणार आहे.

Check Also

राज्यातील सरकारी दवाखाने आणि आरोग्य सुविधेत आता खाजगी गुंतवणूकदार खासगी गुंतवणुकीद्धारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *