Breaking News

हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांच्या नावाऐवजी सुप्रियांच्या नावावर एकमत

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासह विविध प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील पक्षाला हवे असलेले नवे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या रूपाने स्थापित करण्याचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे छगन भुजबळ, अजित पवार, सुनिल तटकरे, स्वर्गिय आर.आर.पाटील यांच्या रूपाने नेतृत्वाची फौज होती. मात्र नंतरच्या कालावधीत छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. तर अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी अडचणीत येण्याचे प्रसंग उद्भवले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आश्वासक नेतृत्वाचा चेहरा म्हणून आर.आर. पाटील यांच्याकडे पाहीले जाते होते. परंतु त्यांच्या निधनामुळे पक्षाला नव्या नेतृत्वाचा शोध घेणे आवश्यक बनल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकांना आणखी दोन वर्षांचा कालावधी असला तरी नवे नेतृत्व राज्यासमोर उभे करणे आवश्यक होते. त्यातच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वाढत्या वयानुसार त्यांच्यावरही मर्यादा येत आहेत. यापार्श्वभूमीवर निष्कलंक चारित्र्याच्या आणि आक्रमक स्वरूपाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाचा पर्याय पुढे आला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पक्षाकडून स्थापित करण्यासाठी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी हल्लाबोल-जनआक्रोश मोर्चाच्या झालेल्या सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच वक्त्यांनी विशेषत: प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, हेमंत टकले यांच्यासह सर्वांनीच सुप्रिया सुळे यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नाचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले. यातील काही नेत्यांनी तर अजित पवारांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. यावरून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *