Breaking News

निकाल गुजरातचा मात्र असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधकांमधील आत्मविश्वास दुणावला

मुंबई : प्रतिनिधी

मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वंच राज्यामध्ये भाजपच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या राजकिय वारूला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गुजरात विधानसभेत भाजप ९९ जागां जिंकत तेथील सत्तेवर चवथ्यांदा स्थानापन्न होणार असली तरी तेथील निसटत्या विजयाने भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली असून गुजरातच्या निकालाची पुन:रावृत्ती महाराष्ट्रातही होवू शकते या भीतीने सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या चेहऱ्यावर मुंबई, नागपूरच्या थंडीतही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हिवाळी अधिवेशन सुरु असूनही गुजरातमधील संभावित विजय मोठ्या जल्लोषात साजरा करण्याच्या उद्देशाने भाजपकडून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये तयारी करण्यात आली. मात्र जसजसे निकालाचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली. तसतशी काँग्रेस आणि भाजपमधील काटे की टक्करचे आकलन भाजप कार्यकर्त्ये आणि नेत्यांच्या लक्षात येवू लागली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळेल की नाही याची शाश्वती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना वाटत नव्हती. त्यामुळे अनेक नेत्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करत अंतिम निकाल काय लागतो याकडे लक्ष ठेवले. अखेर भाजपला निसटता विजय मिळत गुजरातच्या सत्तेच्या चाव्या कायम राखण्यात यश मिळाले. तरी आगामी काळात त्याची पुर्न:रावृत्ती महाराष्ट्रातही घडण्याच्या शक्यतेने आनंदाचा जोष नसल्याचे भाजपच्या सर्वच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या देहबोलीतून जाणवत होते.

भाजपच्या निसटत्या विजयाने आणि काँग्रेसच्या ८० जागा जिंकण्याच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे संबध महाराष्ट्रातील राजकारणात एका झटक्यात काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाबद्दल आश्वासक भावना निर्माण झाली. त्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत “आपण म्हणू तीच पूर्व दिशा असं चालणार नाही. हे आजच्या गुजरात निकालातून नक्कीच सिध्द झाले आहे. जे लोक म्हणत होते की, २०१९ चे सोडा २०२४ चे बोला त्या लोकांना या निकालाच्या माध्यमातून एक चपराक लागावली असल्याचे” सांगत निकालामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन येण्याची आशा त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ, तेरा राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा आणि प्रशासन या सर्वांविरोधात राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गुजरातचा निकाल उत्साहवर्धक असून गुजरात मध्ये भाजपचा नैतिक पराजय झाल्याची टीका करत काँग्रेसने दिलेल्या काटे की टक्करने महाराष्ट्रातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला जोषच दाखवून दिला.

परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपाने सातत्याने मांडलेला विकासाचा मुद्याचा विजय असल्याचे सांगत जोष दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र निसटत्या विजयाने हिमाचल प्रदेशातील निखळ विजयाचाही आनंद त्यांना प्रतिक्रियेतून दाखविता आला नाही.

Check Also

मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *