Breaking News

गुजरातची निवडणूक ठरविणार महाराष्ट्रातील राजकारण पुढील राजकिय वाटचालीच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून चाचपणी

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. गुजरात विधानसभेचा निकाल १८ डिसेंबरला जरी लागणार असला तरी त्या निवडणूकीच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते अवलंबून बदलणार असून शिवसेनेची भूमिका आणि विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे भवितव्यही ठरणार आहे. प्रत्येक राजकिय पक्षाकडून संभावित युती-आघाड्यांची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

गुजरातच्या निवडणूका जिंकण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच जेरीस आणले आहे. त्यातच स्थानिक गुजराती लोकही भाजपला फारसे प्रतिसाद देताना दिसत नाहीत. त्यामुळे तेथे काँग्रेसला सत्ताबदलाची आशा आहे. काँग्रेसच्या अपेक्षप्रमाणे सत्ताबदल झाल्यास महाराष्ट्रातही काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेत बदल झालेला आगामी काळात पाह्यला मिळणार असल्याचे मत कॉंग्रेसमधील नेत्यांकडून खाजगीत व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याच्या राजकारणात शिवसेनेची भूमिकाही या निकालानंतर बदलणार असून गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाल्यास गेल्या दोन वर्षापासून खिशात ठेवलेले राजीनामे राज्यपालांकडे कधीही सादर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात पहिल्यांदाच शिवसेनेकडून भाजपविरोधी पक्षांशी हातमिळवणी केली जाण्याची शक्यता अधिक असून यादृष्टीने चाचपणी करण्यात येत असल्याच्या गोष्टीला कॉंग्रेससह शिवसेनेतील नेत्यांनी खाजगीत बोलताना दुजोरा दिला.

राज्यातील विधानसभा निवडणूकांना अद्याप दिड वर्षाचा कालावधी शिल्लक राहीलेला असला तरी प्रत्येक राजकिय पक्षाकडून आतापासूनच राजकियस्तरावर मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पार्टी, रिपाईचे सर्व गट, एमआयएम, शेकाप, माकप या छोट्या पक्षांकडून भाजपविरोधी महाआघाडीत सहभागी होण्याचे संकेतही मिळत आहे. त्यामुळे गुजरातमधील भाजपचा पराभव हा महाराष्ट्रासह देशभरात भाजपमुक्त देशाच्या वाटचालीकडे सुरु होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत राजकिय अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *