Breaking News

द्राक्ष बागायतदार संघाचे कार्य आता शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे द्राक्षसंघाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा मांडणारा अभिजित झांबरे यांचा लेख

पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्रदादा पवार तर उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. त्याचसोबत इतर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीस या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करीत असतानाच त्यांच्या हातून द्राक्षशेतकऱ्यांच्या हिताचे कार्य घडो अशा शुभेच्छा.

तसं पाहता आज द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाकडे पाहिले जाते. त्यामुळे  या संस्थेकडून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. किंबहूना तशा अपेक्षा ठेवणे यात काहीच गैर नाही. आज पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर या शहरांच्या ठिकाणी संघाची स्वःमालकीच्या इमारती असलेली प्रशस्त कार्यालये आहेत तसेच  मांजरी येथे द्राक्षसंशोधन केंद्र आहे. परंतु इतकी सर्व व्यवस्था असताना  अद्यापही संघाचे कार्य द्राक्ष शेतकऱ्यांच्या बागेपर्यंत पोहचले आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही.

संघाचे कार्य केवळ जी.ए पुरविणे आणि जिल्हा पातळीवरील शेतकऱ्यांकडून ५० रुपये घेऊन चर्चासत्र भरविणे एवढ्या पुरतेच मर्यादीत राहू नये अशी समस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

आज द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न व समस्या आवासून उभ्या आहेत. त्यातच नैसर्गिक संकटाशी लढता-लढता या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडताना दिसत आहे. अशावेळी संघाने शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याची गरज आहे. तसं पाहता द्राक्षफळ हे एक संवेदनशील पीक आहे. त्यामुळे खराब हवामानात ते रोगांना लगेच बळी पडते. त्यामुळे दरवर्षी खराब हवामानाचा फटका बसून राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत असते. त्यामुळे द्राक्षशेतकऱ्यांना  हवामानाचा योग्य व अचूक अंदाज देणारी यंत्रणा द्राक्षपट्ट्यातील भागात उभी करण्यासाठी संघाने पुढाकार घेऊन शासनदरबारी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

त्याचबरोबर दरवर्षी अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक कारणांनी तर  बोगस औषध कंपन्याच्या बनावट औषधांच्या फवारणीमुळे द्राक्षफळांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते, परंतु शासकीय यंत्रणांकडून या नुकसानीचे साधे पंचनामे करण्यासाठी देखील कानाडोळा केला जातो. अशावेळी बागायतदारसंघाने पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

दरवर्षी परप्रांतीय दलाल, व्यापारी मंडळीकडून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. परंतु पोलीस यंत्रणेकडून वेळेवर या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. तसेच आरोपींचा तपास देखील वेळेवर होत नाहीत. अशा प्रसंगी द्राक्षसंघाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे.  दुर्दैवाने संघाकडून अशावेळी सहकार्य होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

आज मार्केटमध्ये शेकडो बोगस रासायनिक औषध कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत, राजरोसपणे शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम या औषध कंपन्यानी सुरु केले आहे.  या कंपन्याकडून महागडी औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. पंरतु या औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणारी अशी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. संघाने या भरमसाठ किमंतीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच अशा बोगस औषध कंपन्यावर देखील शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आज काही प्रयोगशील द्राक्षशेतकऱ्यांनी द्राक्षाच्या काही नवीन व्हेरायटी शोधून काढल्या आहेत. या व्हरायटींची आज राज्यातील शेतकरी मोठ्याप्रमाणात लागण करीत असल्याचे चित्र आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन या व्हरायटींवर अधिकचे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामधील गुण-दोषांची, फायद्या-तोट्यांच्या सुत्रात योग्य पडताळणी करुन त्या व्हरायटींच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आज स्ट्रॉबेरी, आंबा, संत्रा यासारख्या फळपिकांचे जोरदार ब्रँडिंग होत असताना आपले द्राक्षपीक यात कुठे आहे असा सवाल सर्वच द्राक्षउत्पादकांना पडत असतो. आज मार्केटमध्ये रासायनिक औषधांच्या फवारणीवरुन द्राक्षफळाबाबतीत चुकीचा प्रचार होऊन द्राक्षफळ बदनाम होत असल्याचे चित्र आहे. परिणामी ग्राहक द्राक्षाकडे तोंड फिरवत असल्याचे काहीसं वास्तव आहे. त्यामुळे ब्रँडिंगच्या बाबतीत देखील संघाकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

खरं तर द्राक्षबागायतदार संघाकडून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नुतन अध्यक्ष राजेंद्र दादा पवार ही द्राक्षशेती क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहे.  त्यामुळे द्राक्षशेतकऱ्यांपुढील विविध प्रश्नांचा ते नक्कीच गांभीर्यपुर्वक विचार करतील आणि शहरात असलेल्या द्राक्ष संघाच्या कार्यालयातून, संघाचे कार्य तळागाळातील द्राक्ष शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जातील अशी अपेक्षा आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *