Breaking News

१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित १ हजार ५६६; तसेच जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित १२ हजार ६६७ अशा एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोवीडची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर १९ नोव्हेंबर २०२० रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह ५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदार याद्यांवर तेंव्हापासून ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *