Breaking News

सरकारी विमान वापरावरून सरकार विरूध्द राज्यपाल-भाजपा राजभवन सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर विरोधी दावे

मुंबई : विशेष प्रतिनिधी
सरकारी कामासाठी डेहराडूनला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. मात्र त्यास परवानगी दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर त्याबाबत कोणतीच माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली नसल्याचा प्रतित्तुर राजभवनाकडून कळविण्यात आल्याने सरकारी विमान वापरावरून राज्य सरकार विरूध्द राज्यपाल असा सामना रंगला असतानाच विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यास सुरु झाली.
राजभवन सचिवालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शासकिय दौऱ्याची माहिती १२ दिवस आधी राज्य सरकारला कळविली होती. मात्र विमान वापरास परवानगी आहे किंवा नाही याबाबत राज्य सरकारने कोणतीच माहिती राजभवनास कळविली नसल्याचा दावा राजभवनाकडून करण्यात आला आहे.
तर राज्य सरकारकडून राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. तसेच राज्यपालांच्या दौऱ्याला परवानगी देण्यात आली नसल्याचे काल बुधवारी कळविण्यात आल्याचे राज्य सरकारकडून कळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे राज्यपाल विरूध्द राज्य सरकार असा सामना रंगल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले.
त्याचबरोबर राजभवनाने खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले असले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अवमान म्हणजे संपुर्ण राज्याचा अवमान झाला आहे. हा अवमान करण्याची घोडचूक महाविकास आघाडी सरकारने केली आहे. अशा आशयाची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. तर ही टीका परतवून लावताना राज्य सरकारच्या समर्थनात महाविकास आघाडीचे मंत्री, नेते यांनी किल्ला लढवला आहे.
राज्य सरकारच्या वतीने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
उत्तराखंड राज्यातील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीतील सनदी अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते. त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आले होते, ही परवानगी मिळाली नव्हती. दरम्यान गुरूवार सकाळी राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटे विमानात बसून होते. परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचे व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली.

 

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *