Breaking News

एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली.
काल दिवसभर झालेल्या बैठकीनंतर संध्याकाळी एसटीचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन देण्यासंदर्भात आणि ४१ टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सदाभआऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे ही उपस्थित होते. मात्र परिषदेनवेळी राज्य सरकारने केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने आम्ही आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून नंतर भूमिका जाहीर करू अशी घोषणाही या दोघांनी केली. त्यानुसार आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर यासंदर्भातील भूमिका सकाळी ११ वाजता जाहीर करण्याची घोषणा केली. त्यानुसार या दोघांनीही संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. परंतु राज्यातील कामगारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे जाहिर करत या आंदोलनातून काढता पाय घेतला.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी सकाळी राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, आज आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली.
सरकारने सांगितले आहे की, राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला १० तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे. पण सरकार दोन पावलं पुढे आलं आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू असे स्पष्ट करत आझाद मैदान येथे सुरू केलेलं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांसोबत असू असे सांगत सध्या तरी या आंदोलनातून आपण बाहेर पडत असल्याचे खोत यांनी अप्रत्यक्ष जाहिर केले.
कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभे केलं होते. आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. आम्ही तात्पुरतं आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं आहे. कामगारांनी हे आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. भविष्यात वेतनवाढीसाठी आपण आंदोलन करू शकतो. आंदोलकांनी पुढे आंदोलन सुरू ठेवलं, तर त्याला आमचा पाठिंबा असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा राज्याच्या इतिहासातला कामगारांनी स्वत: उभ्या केलेल्या संपातला एक मोठा विजय आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय कामगारांचं मोठं यश आहे. पहिल्या टप्प्यातला हा विजय आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच ठेवायची आहे. कामगारांच्या संपाला राज्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणात सहानुभूती लाभली होती. शासकीय कर्मचारी आणि एसटी कामगार यांच्यातली तफावत सरकारला दूर करावी लागेल. आम्ही दोघे आमदार एसटी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात त्यांची बाजू मांडत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संपाचं नेतृत्व ना गोपीचंद पडळकर करतायत, ना सदाभाऊ खोत करतायत. आम्ही भाजपाचे आमदार म्हणून संपात सहभागी झालेलो नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलनाला आम्ही आझाद मैदानावर सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना तिथे यायचं आवाहन केलं. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी तिथे दाखल झाले. पण विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत संप तसाच सुरू ठेवणं शक्य नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी कामगारांसमोर मांडली.

दरम्यान, आझाद मैदानावरील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून राज्यातील डेपोसमोर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आंदोलन सुरु ठेवण्याच्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे या आंदोलनात दुफळी पडल्याचे दिसून येत आहे.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *