Breaking News

गाठोडं सोन्याच… (सत्य घटनेवर आधारित) सर्जनशील कलाकार, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची कथा

वेळ साधारण, रात्र संपून दिवस उजाडायच्या आधीची, दोन चोर सोन्याच्या दुकानातली चोरी आटोपवून सगळा माल आपल्या जवळच्या गाठोडयात बांधून त्यांच्या खटारा इंडिका ह्या गाडीमध्ये घेऊन बसले. ज्या गावात चोरी केली ते गाव मागे जावून काहीच वेळ झाला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, एक पोलीसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. दोघेही भयंकर घाबरले, काय करायच हे सुचत नसल्याने काही अंतरावर त्यांनी ते गाठोडं रस्त्याच्या कडेला झाडामध्ये फेकून दिलं आणि आपल्या गाडीचा स्पीड वाढवून पसार झाले, पोलीसही त्यांच्यामागे निघून गेले. खरं तर ते पोलिस त्याच्या मागावर नव्हतेच.

दिवस उजाडला पक्षी किलबिल करू लागले, गावातील लोकांची आवाजाही सुरू झाली, शाळेतली मुलं शाळेत जाण्यासाठी निघाले, म्हणजेच वेळ साधारण सकाळी ७ वाजताची असावी. दररोज प्रमाणे ‘तोळा भिया’ आपल्या आणि गावातील काही बकऱ्या घेऊन चरण्यासाठी आपल्या ‘हरसुल’ ह्या गावातून निघाला. गावची गोधरी पार केल्यानंतर तांड्यातल्याही काही बकऱ्या त्याच्या बकऱ्यांच्या घोळक्यात जमा झाल्या. बकऱ्या आणून सोडणाऱ्याला तो म्हणाला, ‘माटी, तू मारवाळ पिसा कना देच रे बापू?’ (ओ दादा तुम्ही माझे पैसे कधी देता?) पण तो माणूस त्याला काहीही न बोलता पुढे निघून गेला. तोळा भिया स्वतःशीच बोलत पुढे चालत राहिला. आपल्या सायंकाळच्या हातभट्टीच्या दारूची आज काय सोय लागेल? हा प्रश्न त्याला भेडसावत होता.

पुढे चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला झाडांमध्ये पडलेले गाठोडे दिसल, सामान आपले नसल्यामुळे त्याला हात लावायचा की नाही म्हणून, ‘केर छ रे ई? कोणाच गठुडा होय का?’ असं जोर जोरात ओरडत होता. त्या गाठोडयाचा कोणीही मालक दिसत नाही हे बघून त्याने ते गाठोड उचलल आणि काही अंतरावर जावून झाडाच्या सावली मध्ये बसून ‘गाठोड उघाडायच की नाही?’ याचा विचार करत बसला, शेवटी न राहून त्याने ते उघडलेच. गाठोडयातलं सोन्याचे दागिणे बघून त्याचे डोळे विसफारले ‘आज आपल्या दारूची सोय झाली’ याचा आनंद त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता पण, ‘हे दागिणे सोन्याचे आहेत की डुप्लीकेट? नाही नाही सोन्याचे असते तर एवढे दागिणे कोण कशाला रस्त्यावर फेकेल?’ या द्वंद्वात तो पडायला.  शेवटी, ‘हे दागिणे डुप्लीकेटच (बेलटेक्सचे) आहेत’ हे आपणच ठरवून मोकळा झाला. दिवसभर ते गाठोड सोबत घेऊन बकऱ्या चरत होता.

सायंकाळी दररोज गावात यायच्या वेळेपेक्षा आज तोळा लवकर गावात आला, बकऱ्या बांधून सरळ स्टेसनरीच्या दुकानावर गेला. गाव छोट असल्यामुळे गावात एकाच स्टेशनरीच दुकान, रुपेश केवटेच. गावातला १० वी शिकलेला बेकार पोरगा, काही काम करत नाही म्हणून बापाने त्याला दुकान टाकून दिल. तेच हे दुकान.

दुकानात आल्यावर तोळा भिया रुपेशला बोलला, ‘मालक माहयाकड काही माल आहे, घेता का इकत?’ तोळा बेवडा माणूस, म्हणून रुपेशला वाटल घरातलच काही समान विकायला घेऊन आला असेल, म्हणून रुपेश म्हणाला, ‘भोसी, घरातल समान इकशील त माहया घरावर दंगडं घेऊन येईल तूही तांडरी, तू जाय रे बापू.’

त्यावर तोळा बोलला, ‘अरे बापू, पाय त खर’ म्हणून त्याने ते गाठोड त्याच्या समोर उघडल. एवढे दगिणे तोळा कडे; यावर त्याचा विश्वास बसेना शेवटी तो म्हणाला, ‘डाका बिका टाकला का काय रे तोळा?’

तोळा, ‘नाही हो मालक, तिथ जयस्वालजीच्या गावखरीच्या झाडात सापडलं, मीन लय विचारलं का, कोणाच होय बा? कोणीच नव्हता.’

रुपेश, ‘बर बर’ असं बोलून ते दगिणे हातात घेऊन तपासू लागला. रुपेश मनातल्या मनात विचार करत होता, ‘दागिणे खरे दिसत आहेत! पण तोळाने आणले म्हणजे हे शंभर टक्के खोटेच असतील, असतील म्हणजे काय आहेतच; रस्त्यावर खरे दगिणे कोण फेकणार? नाही म्हटल तरी हा माल तीन चार हजाराचा तरी नक्की आहे.’ आणि त्याने तोळाला प्रश्न केला, ‘किती पैसे घेशीन?’

तोळा म्हणाला, ‘आता दुकानदार माणसं तुम्ही, आमच्यापेक्षा तुम्हाले भाव जास्त माहीत, तुम्हीच सांगा ना हो.’

रुपेशला तोळा आयतच गावला. रुपेश म्हणाला, ‘मी याचे तुले ३०० रुपये देईन.’

तोळा फक्त भाव करायचं म्हणून बोलला, ‘मालक लय कमी होते, जरा वाढवा.’ लगेच खिशातून पैसे काढत रुपेश म्हणाला, ‘एक काम कर हे घे ५०० रुपये, बस्स!’ एका बकरी मागे तोळाला १० रुपये मिळायचे महिन्याच्या शेवटी त्याला १०० किंवा १५० रुपये मिळत.  आता या डुप्लीकेट; तेही सापडलेल्या दागिन्यांवर! फुकटात ५०० रुपये मिळत आहेत. नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. लगेच ते ५०० रुपये घेऊन तोळाने सरळ दारूच्या गुत्याकडे धाव घेतली. दररोज पाच रुपयाचा एक ग्लास दारू पिणारा तोळा, आज दोन ग्लास दारू प्यायला.

रुपेश दाररोजप्रमाणे लवकर उठून दुकानात लक्ष्मीची पूजा वगेरे संपवून आपण काल तोळा भिया कडून घेतलेल्या दागिन्यांच करायच काय? म्हणून विचारात पडला. जेवताना त्याने मोबाइल वर अँमझोन वर सेल लागला हे पहिलं आणि त्याच्या डोक्यात आयडियाची ट्यूब लाइट पेटली जेवण अर्धवट सोडून तो दुकानाकडे पळाला. गाठोडयातले सगळे दगिणे काढून दुकानात हरेक माल १५० रुपयाने सेल लाऊन बसला. लोकांची गर्दी वाढली पण १५० रुपयाला दागिना घेण प्रत्येकाला जमत नव्हत म्हणून फक्त बघून निघून जात होते. पप्पू; हुशार तरुण गावाच्या बाहेर कॉलेज शिकत होता आणि रुपेशचा चांगला मित्र. पप्पू दुकानात आला त्याने दगिणे पहिले त्याला त्यातली एक अंगठी आवडली त्याने ती विकत घेतली. मित्र म्हणून रुपेश ने त्याला ती १०० रुपयाला लावली. पप्पू घरी आल्यानंतर त्याला ती अंगठीत काही तरी घोळ वाटत होता, त्याने ती अंगठी जरा निरखून पाहिली आणि त्याला असं वाटू लागलं की ही अंगठी खरी तर नाही? हरसुल ह्या गावापासून ४० किलोमीटर वर दारव्हा हे तालुका आणि तेथेच हा पप्पू कॉलेजला शिकायला, कॉलेजला जाताना आपल्या हातातल्या अंगठीची पारख करून घेऊयात म्हणून तो सोन्याच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला बोलला, ‘ही अंगठी मोडायची आहे हो किती येतील हिचे?’ दुकानदाराने ती निरखूण बघितली आणि बोलला, ‘भाऊ याचे तुम्हाला पाच हजार मिळतील.’ म्हणजे ही अंगठी आणि रुपेशच्या दुकानातील सगळे दागिणे खरे आहेत याची खात्री त्याला पटली क्षणाचाही विलंब न लावता ती अंगठी पप्पू ने विकून टाकली आणि ते पाच हजार घेऊन घरी आला पण हे दागिणे खरे आहेत याबद्दल त्याने रुपेशला काहीही सांगितलं नाही. दोन दिवसाने पप्पू परत रुपेशच्या दुकाणात गेला, ‘अजूनही दागिणे कोणी विकत घेतलेच नाही?’ हे बघून त्याला जरा आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला.

रुपेशला त्याने विचारलं, ‘का रे रुपेश, अजून दागिने विकले नाही?’

बाजूच्या मूलाला पेन देत रुपेश बोलला, ‘मरो तिच्या आयला, लोक ले बेकार आहे आपल्या गावचे भाव कमी कर म्हणतात.’

पप्पू – ‘नको करू बे, एकदम खरे वातात हे. माझी आई पण फसली लेका मी तुझ्याकडून अंगठी घेऊन गेलतो न् तिला वाटल ती खरीच आहे’ दोघेही हसतात. ‘आता तर तिला एक हार, बापाला एक चैन नेऊन देतो म्हातारा म्हातारी दोघेही खुश’ असं म्हणत पप्पू ने एक हार आणि एक चैन विकत घेतली भाव तोच १०० रुपयाला एक. लगेच ती चैन आणि हार घेऊन परत दारव्हाच्या त्या सोनाराकाडे गेला आणि तेही विकून पैसे घेऊन आला. पप्पूचे हे कार्य सतत पाच सह दिवस सुरू होते. दररोज नवीन नवीन दगिणे कुठून घेऊन येतो हा मुलगा? त्या सोनाराला पप्पूवर संशय आला त्याने लगेच ती खबर पोलिसांना दिली. पोलिसानी विलंब न करता पप्पूसाठी सापळा रचला.

सोनारांच्या दुकानात पप्पू पोलिसांना सोन विकताना रंगेहात सापडला. पोलिसांच्या चौकशीत हे निष्पन्न झालं की पप्पूच्या गावचा मित्र म्हणजे रुपेश याकडे किमान पाच किलो सोनं आहे, पोलिसांनी रुपेशच्या दुकानावर धाड टाकली. त्यानंतर रुपेशला कळल की आज पर्यन्त जे सोनं खोट म्हणून हरेक मालमध्ये विकत होता, ते खर होतं; एवढं सोन आपल्याकडे असून आपण मूर्खासारखे खोट समजत होतो. आधीच कळलं असत तर आपल्या एवढं श्रीमंत कोणी नसतं. पोलिसांनी त्याला विचारल की हे एवढं सोनं कुठून आणलं ? त्यावर त्याने सांगितल की तोळाने हे सोन आणलं पण ते कुठून आणलं हयाबद्दल रुपेशला काही कल्पना नव्हती. तोळाची चौकशी करण्यासाठी गावात यायला निघाले. पोलिस येईपर्यन्त ही बातमी संपूर्ण गावात आणि तोळापर्यंत पोहचली. तोळाला याचा जबरबस्त झटका बसला, तो गावभर रडत फिरत आहे. पोलिस आले तेव्हा त्यांना कळलं त्याच्या डोक्यावर आघात झालं तो पागल झाला, त्यामुळे त्याची चौकशी रद्द केली. आज रुपेश आणि पप्पू जेल मध्ये आहेत. सगळ सोनं सरकार जमा झालं, तोळा हल्ली ‘माझ आहे हे सोनं’ असं म्हणत धुण्याचेही गाठोडे घेऊन पळतोय.

Ankur Wadhave

[email protected]

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *