Breaking News

टकमक टोकावर बसून दिग्पालने लिहिली सिनेमाची पटकथा सिनेमासाठी जवळजवळ सहा वर्षे संशोधन

मुंबई : संजय घावरे

एखादा सिनेमा लिहायचा म्हटला की त्यासाठी त्या पोषक वातावरण गरजेचं असतं असं सर्वच लेखक सांगतात. पटकथेसाठी आवश्यक असणाऱ्या कल्पना विस्तारासाठी काहीजण एकांतात जातात, तर काही गर्दीच्या शहरातही स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतात… काही ध्येयवेडे लेखक-दिग्दर्शक मात्र याला अपवाद ठरतात. या पठडीत मोडणारे लेखक पटकथेसाठी आवश्यक असणारी लेखनाची खोली गाठण्यासाठी कोणत्याही प्रकारचं धाडस करायला धजावतात. ‘फर्जंद’ या आगामी सिनेमाच्या लेखनासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने असंच काहीसं आगळंवेगळं धाडस केलं आहे. या सिनेमाची पटकथा आपण रायगडावरील टकमक टोकावर बसून लिहिल्याचं ‘मराठी ई बातम्या’शी खास बातचित करताना दिग्पालने सांगितलं.

‘फर्जंद’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कोंडाजी फर्जंद याच्या लढवय्या बाण्याची कथा पाहायला मिळणार आहे. हिंदी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकित मोहन या सिनेमात शीर्षक भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने संवाद साधताना दिग्पालने सिनेमाच्या लेखनाबाबतचं रहस्य उलगडलं. तो म्हणाला की, या सिनेमासाठी मी जवळजवळ सहा वर्षे रिसर्च केला आहे. कोंडाजी फर्जंदच्या जिंकलेल्या लढाईचा अभ्यास करताना शिवरायांनी जिंकलेले जवळजवळ सर्वच गड-किल्ले पालथे घातले. या सिनेमाची पटकथा मी रायगडावरील टकमक टोकावर बसून लिहिलीय हे कोणाला सांगून खरं वाटणारं नाही. महाराजांच्या आशिर्वादानेच हे शक्य होऊ शकलं. त्यासाठीच ही स्क्रीप्ट खूप दैवी असल्याचं मी मानतो. या स्क्रीप्टला तिथपासून आशिर्वाद आहे. मूळ ठिकाणाहून याची प्रेरणा मिळाली आहे. हा अख्खा सिनेमा दोन वर्षे माझ्या डोक्यात तरळत होता. एक दिवस असह्य झालं. त्यावेळी मी ‘तू माझा सांगाती’ या मालिकेचं लेखन करत होतो. तिथून मला सुट्टी मिळाली. मी लगेच समीर बुधकर आणि केदार दिवेकर या दोन मित्रांना फोन केला. मी रायगडावर जातोय तुम्ही येताय का, असं विचारलं. दोघेही तात्काळ तयार झाले. आम्ही तिघेजण रायगडावर गेलो. दुपारी साडेबारा वाजता पोहोचलो. जेवण वगैरे झालं होतं. मी लॅपटॅाप बाजूला ठेवला. जाताना तीन पुलस्केप वह्या आणि डझनभर पेनांचा गठ्ठा घेऊन गेलो होतो. लॅपटॅापची बॅटरी संपली आणि लेखन अर्धवट राहिलं असं काहीही कारण मला नको होतं. दुपारी दोन वाजता मी लिहायला सुरुवात केली आणि संध्याकाळी साडे सहा वाजता जय भवानी, जय शिवराय लिहून स्क्रीप्ट संपवली. पाच तासांमध्ये मी ‘फर्जंद’चं संपूर्ण डायलॅाग व्हर्जन लिहून काढलं. त्यामध्ये नंतर केवळ पाच टक्के बदल झाला. ते बदलही नंतर सापडलेल्या तथ्यांमुळे करण्यात आले. त्यानंतर काहीच बदल झाले नाहीत. कलाकारांनीही या स्क्रीप्टचा खूप आदर केला. इतकंच काय तर या सिनेमातील शिवाजी महाराजांचा लुकही रायगडावरील होळीच्या माळावरील पुतळ्यावरून प्रेरीत आहे. शिवरायांच्या भूमिकेसाठी जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर चिन्मय मांडलेकरचा चेहरा आला, तेव्हा होळीच्या माळावरचा पुतळा माझ्या मनात होता. त्या पुतळ्यावरून प्रेरीत होऊन चिन्मयला शिवाजी महाराजांचा लुक देण्यात आल्याचंही दिग्पाल म्हणाला.

स्वामी समर्थ मुव्हीजची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’ची सहनिर्मिती संदीप जाधव, महेश जाऊलकर आणि स्वप्निल पोतदार यांनी केली आहे. या सिनेमात कोंडाजी फर्जंदची व्यक्तिरेखा अंकित मोहनने साकारली असून, त्याच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, हरीश दुधाडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, राजन भिसे, राहुल मेहंदळे, अंशुमन विचारे आदी कलाकार आहेत. १ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलं असून, निखील लांजेकर यांनी ध्वनीलेखन केलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *