Breaking News

BreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी

मागील १० दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तरीही अपेक्षेइतकी रूग्णसंख्येत घट होत नसल्याने १५ जून पर्यत निर्बंधात वाढ करण्यात आली होती. परंतु ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच ७ जून २०२१ अर्थात सोमवारपासून BreakTheChain अंतर्गत निर्बंध शिथील करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यातील जिल्ह्यांची पाच टप्प्यात वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

अ, ब, क, ड, ई मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये खालील सवलती मिळणार

राज्यात पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटीचा दर ५ टक्के आणि ऑक्सीजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरले असतील त्या जिल्ह्याचा समावेश अ वर्गात करण्यात आला आहे. या वर्गातील जिल्ह्यांमध्ये सर्व अत्यावश्यक- अनावश्यक दुकाने नियमित पध्दतीने उघडण्यास परवानगी, सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने खुली ठेवण्यास परवानगी, मॉल्स, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे पूर्वीप्रमाणे सुरु राहणार, हॉटेल-रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरु राहणार, लोकल ट्रेनबाबतचा निर्णय स्थानिक डिएमए समिती निर्णय घेतल्याप्रमाणे सुरु राहणार, सार्वजनिक ठिकाणे, सायकलिंग, मॉनिंग वॉक, खुली मैदाने पूर्वीप्रमाणे उघडी राहणार, खेळाच्या सुविधा, चित्रपट आणि दूर चित्रवाणी मालिकांसाठीचे चित्रीकरण करण्यास नियमित परवानगी, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी, लग्न- अंत्यविधीच्या कार्यक्रमास उपस्थितीची मर्यादा नाही, राजकिय कार्यक्रम, मिटींग्ज, सर्वसाधारण सभा घेण्यास पूर्वी प्रमाणे परवानगी.

याशिवाय बांधकाम करणे, शेतीविषयक कामे, ई-कॉमर्स आणि इतर सेवा, जीम-सलून-ब्युटी पार्लर-स्पा-वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक सेवा आदींना पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी, प्रवास पूर्वीप्रमाणे करता येणार, निर्यात सुरु राहणार, कारखाने-उद्योग, डाटा सेंटर नियमित पध्दतीने सुरु ठेवण्यास परवानगी. अ वर्गातील जिल्ह्यांमध्ये कोणत्याही पध्दतीची जमावबंदी, संचार बंदी लागू राहणार नाही.

ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्याच्या दरम्यान ऑक्सीजन बेड भरले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश ब वर्गात करण्यात आला आहे. या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक- अनावश्यक वस्तुंची दुकाने नियमित वेळेत अर्थात पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स नियमित वेळेत उघडण्यास आणि सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. तर चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे आणि मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने, लोकल ट्रेन सेवा अत्यावश्यक वर्गातील नोकरदार-वैद्यकीय आदींना आणि महिलासह राज्य सरकारने परवानगी दिलेल्या वर्गांतील व्यक्तींना प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे-खुली मैदाने- वॉक-सायकलिंग आदी गोष्टींना पूर्वीप्रमाणे परवानगी, शासकिय आणि खाजगी आस्थापनांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी, स्पोर्टस् अॅक्टीव्हीटी सकाळी ५ ते रात्रो ९ वाजेपर्यंत इनडोअर आणि आऊटडोअर सुरु ठेवण्यास परवानगी. दूरचित्रवाणी-चित्रपटांचे चित्रीकरण पूर्वीप्रमाणे करण्यास परवानगी, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करण्यास परवानगी, लग्न समारंभासाठी १०० जणांची उपस्थिती बंधनकारक तर अंत्यविधी कार्यक्रमाला पूर्वीप्रमाणे परवानगी देण्यात आली असून त्यास उपस्थितीची अट राहणार नाही. निवडणूकीच्या अनुषंगाने राजकिय कार्यक्रम, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभांना ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी, बांधकाम-शेतीविषयक-इ कॉमर्ससह सर्व सेवांना पू्र्वीप्रमाणे परवानगी, जमावबंदी आदेश लागू राहणार, जीम-सलून-स्पा-ब्युटी पार्लर-वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी, सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी मात्र उभे प्रवासी वाहतूकीस बंदी, ट्रकने तीन व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी, जिल्ह्यातंर्गत प्रवास पूर्वीप्रमाणे करण्यास परवानगी, उद्योग-कारखाने पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी.

तर ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्क्याच्या दरम्यान पॉझिटीव्हीटीचा दर आणि ४० टक्क्याहून अधिक ऑक्सीजन बेड भरले असतील अशा जिल्ह्यांना क वर्गात स्थान देण्यात आले आहे. अशा जिल्ह्यांमध्ये सर्व अत्यावश्यक-अनावश्यक दुकाने ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी., मॉल्स-चित्रपटगृहे-मल्टीप्लेक्स-नाट्यगृहे बंद राहणार, रेस्टॉरंट कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी त्यानंतर मात्र पार्सल सेवा सुरु ठेवण्यास मान्यता दिली. लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, महिलांसाठी वापरता येणार, सार्वजनिक ठिकाणे-खुली मैदाने-सायलिंग-वॉक आदी गोष्टी सकाळी ५ ते रात्रो ९ वाजेपर्यंत दररोज परवानगी, सर्व खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर शासकिय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. फक्त आऊटडोअर खेळास सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ६ ते रात्रो ९ वाजेपर्यत परवानगी, चित्रीकरण करण्यास संध्याकाळी ५ वाजेपर्यत परवानगी, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने आयोजित करण्यास परवानगी, लग्न समारंभांना फक्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी, अंत्यविधीला फक्ती २० नागरीकांची उपस्थिती बंधनकारक, निवडणूक-सहकारी संस्थांच्या सभांना ५० टक्के क्षमतेची परवानगी, बांधकाम फक्त बाहेरील बाजूस करण्यास ४ वाजेपर्यंत परवानगी, शेतीविषयक कामांना ४ वाजेपर्यत परवानगी, ई-कॉमर्ससह इतर सेवांना पूर्वीप्रमाणे परवानगी, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर ५ नंतर संचारबंदी लागू राहणार, जीम-सलून-स्पा-व्युटी पार्लर-वेलनेस सेंटर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार परंतु त्यासाठी ग्राहकांना अपॉईंटमेंट घ्यावी लागणार एसी असलेल्या या दुकांने बंद राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा उभे प्रवासी न घेता १०० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी, ट्रकने तीन जणांना प्रवास करण्यास परवानगी, आंतरजिल्हा प्रवासास परवानगी, उद्योग-कारखाने पूर्वीप्रमाणे सुरु ठेवता येणार मात्र मॅन्युफॅक्चरींग युनिट ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी.

ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटीव्हीटी दर आणि ६० टक्केपेक्षा ऑक्सीजन बेड भरले असतील त्यांचा समावेश ड वर्गात करण्यात आला आहे. या ड वर्गातील जिल्ह्यांमध्ये फक्त अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर दुकाने, अनावश्यक दुकाने आणि चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स, खाजगी आस्थापनांची कार्यालये बंद राहतील. रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा-होम डिलीव्हरीस परवानगी, लोकल ट्रेन प्रवास करण्यास फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनाच मुभा, सार्वजनिक ठिकाणे-खुली मैदाने-वॉक-सायकलिंग करण्यास दररोज सकाळी ५ ते ९ यावेळेत परवानगी, सर्व खाजगी आणि शासकिय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी, स्पोर्ट्स अॅक्टीव्हीटी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यत आऊटडोअरसाठी परवानगी तर आठवड्याच्या शेवटी परवानगी नाही. चित्रकरण करण्यास परवानगी मात्र गर्दीची दृश्ये घेण्यास बंदी आणि फक्त ५ वाजेपर्यत करता येणार, सामजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास ५० टक्के क्षमतेसह संध्याकाळी ४ वाजे पर्यत परवानगी, लग्नसमारंभासाठी फक्त २५ जणांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती बंधनकारक, राजकिय-सहकारी संस्थांना ५० टक्के क्षमतेसह सभा घेण्यास परवानगी, बांधकाम करण्यास फक्त साईटवरील कामगारांनाच परवानगी, शेतीविषयक कामे संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करण्यास परवानगी, ई-कॉमर्ससह फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी, संचारबंदी लागू राहणार, नॉन एसी जीम-ब्युटी पार्लर-स्पा, वेलनेस सेंटरला ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यत सुरु ठेवण्यास परवानगी, सार्वजनिक वाहतूक ५० टक्के क्षमतेसह मात्र उभे प्रवासी न घेता परवानगी, ट्रकने तीन व्यक्तींना पूर्वीप्रमाणे प्रवास परवानगी, आंतरजिल्हा प्रवास पूर्वीप्रमाणे करता येणार मात्र ई वर्गातील जिल्ह्यामधून जायचे असेल तर ई-पास आवश्यक राहणार आहे, कारखाने-उद्योग-मॅन्युफॅक्यरिंग युनिट ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

तर ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटीचा दर ७५ टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सीजन बेड भरले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश ई वर्गात करण्यात आला असून या जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यत सुरू तर आठवड्याच्या शेवटी ही दुकाने बंद राहणार, अनावश्यक दुकाने, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स नाट्यगृहे, मॉल्स आदी मात्र बंद राहतील, रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीव्हरी सुरु राहणार, लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार, सार्वजनिक ठिकाणे-मोकळी मैदाने-सायकलिंग-वॉक आदी गोष्टीं सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच मुभा राहणार तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंद राहणार, खाजगी कार्यालये फक्त अपवाद ठरविण्यात आलेलीच सुरु राहतील, शासकिय कार्यालये मात्र १५ टक्के क्षमतेने सुरु राहतील, स्पोर्टस अॅक्टीव्हिटी- चित्रीकरण-सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असेल, लग्न समारंभासाठी फक्त कुटुंबियांच्या उपस्थितीस परवानगी असेल, अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहणार, राजकिय-सहकारी संस्थांच्या सभांना फक्त ऑनलाईन परवानगी राहणार, बांधकाम करताना फक्त साईटवरील कामगारांच्या उपस्थित मात्र अत्यावश्यक असलेल्या बांधकामांना परवानगी राहणार, शेतीविषयक कामे कामकाजाच्या दिवशी ४ वाजेपर्यत करण्यास परवानगी राहणार, ई-कॉमर्स आणि इतर सेवांमध्ये फक्त अत्यावश्यक असतील त्यांनाच परवानगी असेल, संचारबंदी लागू राहणार, जीम-ब्युटी पार्लर-स्पा-वेलनेस सेंटर-सलून बंद राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार, ट्रकने तीन व्यक्ती प्रवास करणाऱ्यांना ई-पास आवश्यक, नागरीकांना फक्त वैद्यकीय आणि अत्यावश्यक कारणासाठी प्रवासास परवानगी देण्यात येणार असून ई-पास आवश्यक, कारखाने-उद्योग मॅन्युफॅक्चरींग युनिट आदींना ५० टक्के कामगारांच्या उपस्थित सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अ वर्गातील जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार नियमित पध्दतीने राहतील. मात्र टॅक्सी, लग्न समारंभ, लोकल ट्रेन प्रवास आदींमध्ये मर्यादीत व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत.

पाच वर्गातील अंदाजित जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे

अ वर्गातील जिल्हे – पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

ब वर्गातील जिल्हे – दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

क वर्गातील जिल्हे – तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

ड वर्गातील जिल्हे – चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

ई वर्गातील जिल्हे – पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.

शासकिय आदेशाची प्रत खालीलप्रमाणे-

 

Check Also

मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून? वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवर फाळणीच्या दु:खाची आठवण मात्र पीएमओच्या खात्यावर नाही

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *