Breaking News

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक अखेर निलंबित राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपामुळे मंत्री पद गमवावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना आज अखेर राज्य सरकारने निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले.

विशेष म्हणजे पलांडे यांना अटक केलेल्या तारखेपासून निलंबित करण्यात आले आहे. पलांडे यांना पहिल्यांदा तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करत त्यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात जामीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावत त्यांच्या कोठडीत वाढ केली. त्यामुळे अखेर ४ महिन्यानंतर राज्य सरकारने पलांडे यांना निलंबित केले.

संजीव पलांडे हे अप्पर जिल्हाधिकारी असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ च्या अधिनियम ४(२) (अ) तरतूदीनुसार त्यांच्यावर अटक झालेल्या दिनाकांपासून निलंबित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांना ४८ तासापेक्षा जास्त पोलिस कस्टडीत ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यांना पुढील आदेश होईपर्यत निलंबित करण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय ,सोडता कामा नये असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला एपीआय सचिन वाझे यांनाही सुरुवातीला सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर ईडीने ताब्यात घेतले होते. त्यावेळी राज्य सरकारने वाझे यांना अटक करून दिड महिना झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. त्यानंतर आता पलांडे यांच्या निलंबनाचे आज आदेश जारी केले.

मात्र आरोप करणारे आणि संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी असलेले आयपीएस अधिकारी तथा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अद्याप राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच त्यांच्या विरोधात मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असतानाही त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *