Breaking News

फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर अहवालानुसार रिलायंसच बेस्ट कंपनी बेस्ट एम्प्लॉयर कंपन्यांची यादी जाहिर

मुंबई: प्रतिनिधी

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील बेस्ट एम्प्लॉयर (सर्वोत्तम नियोक्ता) कंपनी बनली आहे. फोर्ब्स बिझनेस मॅगझिनने जगातील बेस्ट एम्प्लॉयर कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला भारतात प्रथम स्थान देण्यात आले आहे. यासह रिलायन्सने जगात ५२ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये जगातील ७५० मोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील एकूण १९ कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. बेस्ट एम्प्लॉयरच्या यादीत आयसीआयसीआय बँक ६५ व्या क्रमांकावर, एचडीएफसी बँक ७७ व्या आणि एचसीएल टेक्नॉलॉजी ९० व्या स्थानावर आहे.

यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया ११९ व्या, लार्सन अँड टुब्रो १२७ व्या, तर इन्फोसिस ५८८ व्या आणि टाटा ग्रुप ७४६ व्या स्थानावर आहे. एलआयसीला ५०४ व्या क्रमांकांवर आहे. 

कोविड काळात व्यवसाय ठप्प होते. लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. अशा वाईट काळात रिलायन्सने कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच त्यांच्या उपचाराच्या आणि कुटुंबाच्या लसीकरणाच्या गरजाही लक्षात घेतल्या गेल्या. कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारशांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहील याची काळजी रिलायन्सने घेतली.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जगातील बेस्ट एम्प्लॉयर होण्याचा मान पटकावला आहे. सॅमसंग यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या ते सातव्या स्थानावर अमेरिकन कंपन्यांचा कब्जा आहे. यामध्ये IBM, Microsoft, Amazon, Apple, Alphabet आणि Dell Technology सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर 8 व्या क्रमांकावर हुआवेई आहे, जी एकमेव चीनी कंपनी आहे. अमेरिकेची Adobe ९ व्या क्रमांकावर आहे आणि जर्मनीचा BMW ग्रुप १० व्या स्थानावर आहे.

मार्केट रिसर्च कंपनी स्टॅटिस्टाच्या सहकार्याने फोर्ब्सने जगातील बेस्ट एम्प्लॉयर कंपन्यांची वार्षिक यादी तयार केली आहे. रँकिंग निश्चित करण्यासाठी, स्टॅटिस्टाने बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या ५८ देशांतील १,५०,००० कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यादीत समाविष्ट होण्यासाठी कंपन्यांना अनेक मापदंडांमधून जावे लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि कंपनीबद्दल त्यांचे मूल्यमापन आणि त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांविषयी त्यांचे मत जाणून घेतले जाते. केवळ पात्र ठरलेल्या कंपन्यांनाच ही पदवी मिळते.

रिलायन्सला नुकताच ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’ चा दर्जा मिळाला. कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक कामात सर्वोत्तम होण्यासाठी सतत मदत करते. कंपनी आणि त्यांच्या विविध व्यवसायांनी वर्ष २०२०-२१ मध्ये अनेक HR उत्कृष्टता पुरस्कार देखील पटकावले आहेत.

Check Also

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *