Breaking News

शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांशी सामंज्यस करार महिंद्रा, रिलायन्स फ्रेशसह २०० कंपन्याशी करार केल्याची मंत्री देशमुखांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्रातील पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी कार्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला असून अटल महापणन विकास अभियानांतर्गत २०० पेक्षा जास्त कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

राज्यात सध्या २० हजार ११५ इतक्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. राज्य सरकारच्या अटल महापणन विकास अभियानातून या सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे राज्यातील किमान ५ हजार वि.का.स. संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. या कामी कॉर्पोरेट कंपन्याही मोठे सहकार्य देत असून त्यांच्या सहभागाने सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांच्या सक्षमीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पलासा ॲग्रो कंपनीने यासंदर्भात नुकतेच मंत्रालयात सादरीकरण केले. त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत किंवा प्रचलित बाजारभाव यापैकी जो जास्त असेल त्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. विकास सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांमार्फत शेतमालाची खरेदी करुन या कंपनीस पुरवठा करण्यात येईल. त्याबदल्यात त्यांनाही मोबदला दिला जाणार आहे. या शेतमालाचे पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग इत्यादी करुन शेतकऱ्यांना बोनसही देण्याची तयारी या कंपनीने दर्शविली आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग करुन त्यांना चांगला भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. .

गोरेगाव (जि. गोंदीया) व इगतपुरी (जि. नाशिक) या तालुक्यातील भात पिकासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. इगतपुरी खरेदी विक्री संघांतर्गत ५२ विकास सोसायट्या आहेत. त्या ठिकाणी घोटी भात पिकासाठी एका कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. आतापर्यंत पलासा ॲग्रो या कॉर्पोरेट कंपनीने १४ खरेदी विक्री संघ व वि.का.स. संस्थांशी विविध कृषी मालाबाबत सामंजस्य करार केले आहेत. यासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्या पुढे आल्या असून आता खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांनीही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *