मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या पुरामुळे १ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३९ गावे व सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ९० गावे अशी १२ तालुक्यातील ३२९ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख ५२ हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध २७० ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व नागरिकांच्या जेवणाचा, कपड्याचा, आरोग्याचा आणि इतर जे काही आवश्यक लागणार खर्च असेल तो सर्व खर्च स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय त्यासाठी खात्यात पैसे नसले तरी जिल्हाधिकाऱ्यांना बँकेतून पैसे काढून खर्च करण्याचे अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या कुटुंबिय स्थलांतरीत झाले नाहीत. मात्र बाधीत गावात किंवा ठिकाणी रहात आहेत, अशा कुटुंबांना १० किलो गहू, १० किलो तांदूळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला १० हजार तर शहरी भागातील कुटुंबाला १५ हजार रूपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे २२ तसेच नौदलाच्या २६, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये २ व कोल्हापुरात ९ पथके, सैन्यदलाची ८ पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात ७६ तर सांगलीमध्ये ९० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या पुरामुळे जवळपास अंदाजित १ लाख हेक्टर जमिन बाधीत झाल्याची शक्यता आहे. तसेच रस्तेही मोठ्या प्रमाणावर खराब, वाहून जाण्याचे प्रकार झाले असणार आहेत. त्यामुळे पुराचे पाणी ओसरले की पहिल्यांदा रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी लागणारा आवश्यक तो माल संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी ओसरल्यानंतर बाधित गावांमध्ये रोगराई पसरू नये याकरिता आरोग्य विभागाची ७० टीम कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अँण्टी स्नेक १२ हजार गोळ्या उपलब्ध, सांगलीत ५ हजार गोळ्या, लेफ्टोसाठी लाखो गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी क्लोरीनच्या १ कोटी टँबलेट वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय खंडीत वीज पुरवठा पुर्वरत करण्यासाठी महावितरणच्या ३२ टीम कोल्हापूरात तर ८ टीम सांगलीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेला असेल तर नवा बसविण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी नवे ट्रान्सफॉर्मरही पाठवून देण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील हॉस्पीटल, शाळा, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणचा वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करण्याबाबत आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
या भागातील बहुंताष शेतकऱ्यांनी विमा योजना काढलेला असून या शेतकऱ्यांना पीकाची नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी केंद्राशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार विमा कंपन्यांना त्या भागात तैनात ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून पीक नुकसान भरपाई लगेच शेतकऱ्यांना मिळेल असेही ते म्हणाले.
या अतिवृष्टी आणि पुरामळे १ जूनपासून आतापर्यंत १४४ व्यक्तींची जीवीतहानी झाली आहे. पूरात फक्त बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ९ व्यक्तींचा मृत्यू आणि ३ जण बेपत्ता झाल्याची एकमेवच घटना आतापर्यंत उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच केंद्र सरकारलाही आपतकालीन मदतनिधीसाठी दोन-तीन दिवसात प्रस्ताव पाठविण्यात येणार असून शेती, शाळा इमारतीचे नुकसान, वीज यंत्रणा, जनावरांचे नुकसान आदी गोष्टींचा त्यात समावेश राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
